तीन दिवसीय ‘कुंभ भक्तिसंगम’ची तयारी पूर्ण

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे नाशिक शहरात आयोजित कुंभ भक्तिसंगमात 28 ऑगस्टपासून भक्ती, संगीत आणि विविध भारतीय सांस्कृतिक परंपरांचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. ‘कुंभ भक्तिसंगम’ या तीन दिवसीय महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. 28 ते 30 ऑगस्टदरम्यान ठक्कर डोम येथे हा महोत्सव होईल. या महोत्सवाला प्रवेश विनामूल्य असून, तिकीट अथवा प्रवेशिका आवश्यक नसल्याने नाशिककर, भाविक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी बुधवारी (दि. 26) पत्रकार परिषदेद्वारे केले.
या महोत्सवाचे 28 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होईल. सायंकाळी 5.30 ते 7 या वेळेत अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन होणार आहे. रात्री 8 ते 10 या वेळेत राहुल देशपांडे ‘अभंगवारी’ सादर करतील. 29 ऑगस्ट हा दिवस ‘भक्ती संमेलन’ आणि विविध भक्ती कार्यक्रमांच्या सादरीकरणांनी समृद्ध असेल. सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 2 ते 4 या वेळेत दोन सत्रांमध्ये भक्ती संमेलन होईल.
पहिल्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : भारतीय संत आणि समरसता’ आहे. पराग महाराज चातुर्मासे हे सत्र समन्वयक असतील. या सत्रात शिवाजी महाराज मोरे, डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी, महंत श्रीमानस शास्त्री, सुदर्शन महाराज कपाटे, सुप्रिया साठे आणि प्रमोद महाराज जगताप सहभागी होतील. दुसर्‍या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा ः राष्ट्रीयदृष्ट्या संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय’ आहे. डॉ. सदानंद मोरे सत्र समन्वयक असतील. श्री राणा महाराज वासकर, डॉ. द्वाराचार्य, महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवितकर, जनार्दन हरीजी महाराज, रामकृष्ण महाराज वीर, मंदार बुवा रामदासी आणि महंत चिरडे बाबा यांचा या सत्रात सहभाग असेल.
भक्ती संमेलनानंतर सायंकाळी 5 ते 7 या वेळेत डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांचे कीर्तन, तर रात्री 8 ते 10 मैथिली ठाकूर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल.
वाहतूक, पार्किंग आणि गर्दी व्यवस्थेचे नियोजन
महोत्सवासाठी येणार्‍या नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक, पार्किंग आणि गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने करण्यात आले आहे. नागरिकांनी वाहनांसाठी निश्चित केलेल्या पार्किंग ठिकाणीच वाहने उभी करावीत आणि वाहतूक पोलिस तसेच कार्यक्रमस्थळी नियुक्त कर्मचार्‍यांच्या सूचनांचे पालन करावे. सायंकाळच्या कार्यक्रमांना रसिकांची मोठी उपस्थिती अपेक्षित असल्याने नागरिकांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पुरेसा वेळ ठेवून ठक्कर डोम येथे पोहोचावे, असे आवाहन आयुक्त सिंह यांनी केले.

गुरबाणीपासून मणिपूरच्या नट संकीर्तनापर्यंत
या महोत्सवाच्या 30 ऑगस्टच्या अंतिम दिवशी देशाच्या विविध भागांतील भक्तिपरंपरांचा विशेष अनुभव घेता येणार आहे. दुपारी 3 ते 8 या वेळेत श्री दरबारसाहिब, अमृतसर येथील भाई मनिंदर सिंह हजुरी रागी यांचे गुरबाणी शबद कीर्तन होईल. दुपारी 4 ते 5 या वेळेत मणिपूरच्या नट संकीर्तन महाजेग्याचे सादरीकरण होईल. सायंकाळी 5 ते 7 या वेळेत निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होईल.

सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या तयारीत पायाभूत सुविधांसोबतच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अनुभवालादेखील महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या नारदीय कीर्तन आणि अभंगवाणीपासून गुरबाणी शबद कीर्तन आणि मणिपूरच्या नट संकीर्तनापर्यंत विविध परंपरा नाशिकमध्ये एकत्र येत आहेत. हा खर्‍या अर्थाने भक्तीचा संगम आहे. – शेखर सिंह,
आयुक्त, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण

Preparations for the three-day Kumbh Bhaktisangam are complete

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *