नेपाळमध्ये महापुरात 300 हून अधिक मृत्यू

नवी दिल्ली : प्रतिनिधी
नेपाळमध्ये हिमनदीचा कडा कोसळल्याने भोटे कोशी आणि इतर नद्यांना आलेल्या भीषण महापुरामुळे संपूर्ण देशात हाहाकार उडाला आहे. या प्रलयंकारी नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 300 हून अधिक लोकांचा बळी गेला असून, शेकडो घरे आणि गावे पाण्याखाली गेली आहेत. निसर्गाच्या या रौद्र रूपामुळे नेपाळचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
या महाभयंकर संकटाचा मोठा फटका भारतीय नागरिकांनाही बसला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, नेपाळमध्ये आलेल्या या पुरामुळे तब्बल 288 भारतीय नागरिक बेपत्ता झाले आहेत. या बेपत्ता नागरिकांशी अद्याप कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. मात्र, सुदैवाने बचाव पथकांच्या अथक प्रयत्नांमुळे आतापर्यंत 21 भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. एकीकडे मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असतानाच, तज्ज्ञांनी आणखी एका मोठ्या धोक्याचा इशारा दिला आहे. हवामान आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञांच्या मते, नेपाळमध्ये परिस्थिती अद्यापही अस्थिर असून पुन्हा एकदा महापूर (सेकंड फ्लड) येण्याची दाट शक्यता आहे. या इशार्‍यामुळे स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांसमोरचे आव्हान अधिकच वाढले असून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम वेगाने सुरू आहे.
सीमेवरील भारतीय गावांमध्ये भीती, चिंता
नेपाळमधील या महापुराचे थेट पडसाद भारतीय सीमेवरील राज्यांमध्येही उमटत आहेत. नेपाळमधून भारतात वाहणार्‍या नद्यांच्या पाणीपातळीत अचानक मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने, उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या सीमावर्ती राज्यांमध्ये प्रशासनाने ’हाय अलर्ट’ जारी केला आहे. सर्व प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीवर चोवीस तास बारकाईने लक्ष ठेवले जात असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी भारतीय यंत्रणा सज्ज आहेत.

Over 300 deaths in Nepal floods

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *