संजय राऊत यांना ईडीचा दणका

अलिबागमधील 8 प्लॉट आणि दादरमधील फ्लॅट जप्त

मुंबई : शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या विरोधात ईडीने फास आवळण्यास सुरूवात केली असून, काल त्यांचे अलिबागमधील आठ प्लॉट आणि दादर येथील फ्लॅट ईडीने जप्त केले. ईडीच्या या कारवाईने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईडी विरुद्ध संजय राऊत असा सामना राज्यात रंगल्याचे चित्र आहे. याआधी सुनील राऊत यांच्यावर ईडीच्या कारवाईबाबत जोरदार वाद झाल्यानंतर आता थेट शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरच ईडीने कारवाई केली आहे. मुंबईतील 1 हजार 034 कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. यासंदर्भात ईडीने कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे.

महाविकासमधील कुरबुरी

 

या कारवाईनंतर बोलताना संजय राऊतांनी भाजपावर प्रतिहल्ला चढवला आहे. कुठली प्रॉपर्टी? आम्ही काय प्रॉपर्टीवाले लोक आहोत का? 2009 साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर आहे.. त्याची आमच्याकडे साधी चौकशी कुणी केली नाही. विचारणा केली नाही. आत्ता मी टीव्हीवर पाहिलं की मालमत्ता जप्त केली. हे काय आर्थिक गैरव्यवहार वगैरे म्हणतात ना, एक रुपया जरी अशा गैरव्यवहारातला आमच्या खात्यात आला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता केली असेल, तरी सर्व मालमत्ता आम्ही भाजपाला दान करायला तयार आहोत, असे संजय राऊत म्हणाले आहेत.


 

One thought on “संजय राऊत यांना ईडीचा दणका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *