समितीकडून छाननी होणार
नाशिक : प्रतिनिधी
प्रशासनाकडे कन्स्ट्रक्शन टीडीआरसाठी सहा प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. बांधकाम विभागामार्फत या प्रस्तावांची समितीचे अध्यक्ष तथा आयुक्तांकडे छाननी होणार आहे. महापालिका प्रशासनाने कन्स्ट्रक्शन अॅमेनिटी टीडीआर लागू करण्यासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करून समिती गठित केली आहे. या धोरणाला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
कार्यपद्धती निश्चिती आणि समिती गठित झाल्यानंतर आता काही नगरसेवकांकडून डीपी रोड तयार करण्याबाबतचे प्रस्ताव मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. यात मखमलाबाद येथील दोन रस्ते, पाथर्डी आणि गंगापूर रोड येथील प्रत्येकी एक, तर सातपूर येथील दोन प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती मनपा आयुक्त तथा समिती अध्यक्ष मनीषा खत्री यांनी दिली. महासभेने अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने कार्यप्रणाली निश्चितीसाठी समिती गठित करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार समिती गठित करण्यात आली आहे. रस्ता विकसित करताना कायदेशीर वाद निर्माण झाल्यास मनपाच्या निगडित असल्यास तो मनपामार्फत निपटरा करण्यात येईल आणि रस्ता विकसित करणार्या व्यक्ती किंवा संस्थेच्या संबंधित असल्यास त्याची संबंधित संस्था, व्यक्तीने निपटारा करण्याची सर्वस्वी जबाबदारी असेल. तयार झालेले रस्ते मनपाकडे हस्तांतरित करण्याबाबतचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अटी-शर्तीनुसार असणे बंधनकारक आहे. समितीने टीडीआर मंजुरीसह इतरही निगडित बाबींशी संबंधित कार्यपद्धती निश्चित केली आहे. यासंदभार्र्तील प्रस्ताव विशेष महासभेने मंजूर केला आहे. नाशिक महापालिकेच्या हद्दीतील विविध प्रयोजनांसाठी आरक्षित असलेले भूखंड हे एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत विकसित करण्याविषयी तरतूद आहे. यानुसार जागामालक किंवा भाडेपट्टाधारकाने, नियोजन प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीने अटींनुसार, हस्तांतरित केलेल्या भूखंडावर त्याच्या स्वत:च्या खर्चाने सुविधा विकसित करून किंवा बांधून ती प्राधिकरणास मोफत हस्तांतरित केल्यास त्याला एफएसआयच्या स्वरूपात हस्तांतरणीय विकास हक्क अर्थात, टीडीआर देण्याची तरतूद आहे.
अशी आहे कन्स्ट्रक्शन टीडीआर समिती
बांधकाम सुविधा टीडीआर समितीचे अध्यक्ष आयुक्त असून, सदस्य म्हणून नगररचनेचे उपसंचालक, शहर अभियंता, विधी विभागप्रमुख यांचा समावेश आहे. नगररचना विभागाचे सहायक संचालक समितीचे पदसिद्ध सचिव आहेत.
Six proposals for construction TDR