नारीशक्ती वंदन’वरून भाजपचे काँग्रेसविरोधात आंदोलन

काळे कपडे घालून काँग्रेस नेते राहुल गांधींचा निषेध

नाशिक : प्रतिनिधी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नाशिक दौर्‍याच्या पाश्वर्र्भूमीवर भाजप नाशिक महानगर-जिल्ह्याच्या वतीने बुधवारी (दि. 2) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ’नारीशक्ती-देशाची शक्ती’ अशा घोषणा देत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी ’पप्पू हटाव’, ’पप्पू गो बॅक’च्या घोषणा देण्यात आल्या.
महिलांना राजकीय क्षेत्रात अधिक प्रतिनिधित्व मिळावे आणि निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने लोकसभेत सादर करण्यात आलेल्या नारीशक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ, तसेच काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
महिलांना लोकसभा व विधानसभांमध्ये 33 टक्के राजकीय प्रतिनिधित्व मिळावे, महिलांना निर्णयप्रक्रियेत समान आणि प्रभावी सहभाग मिळावा, तसेच महिला सक्षमीकरणाला घटनात्मक बळ देणार्‍या नारीशक्ती वंदन कायद्याच्या समर्थनार्थ जनमत जागृत करणे, हा या आंदोलनाचा प्रमुख उद्देश होता. महिलांच्या राजकीय सहभागाचा मार्ग मोकळा करणार्‍या या कायद्याबाबत काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेचा निषेध नोंदविण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
भाजपच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत काळी साडी, काळे वस्त्र परिधान करून, तसेच दंडावर काळी रिबन बांधून निषेध व्यक्त केला. महिलांचा सन्मान, समान प्रतिनिधित्व आणि राजकीय सक्षमीकरण यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
यावेळी ’नारीशक्ती जिंदाबाद’, ’नारी वंदन विधेयकाचा विजय असो’, ’महिला सशक्तीकरणाचा विजय असो’, ’भारत माता की जय’, ’वंदे मातरम्’ अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील परिसर दुमदुमून गेला होता. भाजपतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, आमदार प्रा. देवयानी फरांदे, महापौर हिमगौरी आहेर-आडके, भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार, स्वाती भामरे, आ. अ‍ॅड. राहुल ढिकले, भाजप नाशिक उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष यतीन कदम, सुनील बच्छाव, प्रशांत जाधव, गिरीश पालवे, सुनील देसाई, श्याम बडोदे, दीपाली गिते, छाया देवांग यांच्यासह भाजपचे सर्व मंडल अध्यक्ष, महिला मोर्चाच्या अध्यक्ष, नगरसेवक व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनादरम्यान महिला सक्षमीकरण आणि नारीशक्तीच्या राजकीय सहभागाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आंंदोलनकर्त्यांनी राहुल गांधी गो बॅक, नारीशक्तीला विरोध करणार्‍या काँग्रेसचा धिक्कार असो, नारीशक्ती जिंदाबाद, महिला सशक्तीकरणाचा विजय असो, नारीशक्ती वंदन अधिनियमाचा विजय असो, भारत माता की जय, वंदे मातरम, अशा घोषणा देण्यात आल्या.

राहुल गांधी यांनी नारीशक्ती वंदन कायद्याला विरोध केला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राहुल गांधी किंवा काँग्रेसने नेमके काय केले, याचे उत्तर त्यांनी द्यावे. आमच्या नाशिकमध्ये येऊन महिलांच्या सक्षमीकरणाचे राजकारण करू नका. त्यांची भूमिका आम्हाला मान्य नाही. अशा विचारांचे नेते आमच्या राजकारणात नको, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे.
– हिमगौरी आहेर-आडके, महापौर

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा नाशिक दौरा अत्यंत गुप्त का ठेवण्यात आला, ही बाब संशोधनाचा विषय आहे. काँग्रेस व इतर विरोधी पक्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून युवक-युवतींना भडकवून देशात फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत. नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध करून त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. त्यामुळे नाशिककर महिला, युवती, युवक व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे निषेध आंदोलनात सहभाग घेतला. राहुल गांधी, काँग्रेस व विरोधी पक्षांनी देशात अस्थिरता निर्माण करण्याऐवजी सकारात्मक राजकारण करावे.
– सुनील केदार, भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष

BJP protests against Congress over ‘Narishakti Vandan’

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *