बाप्पा मोरया रे…

पार्वतीच्या बाळा
पायात वाळा
पार्वतीच्या बाळा
पायात वाळा
पुष्पहारांच्या घातल्यात माळा
ताशाचा आवाज तारारारा झाला रं
गणपती माझा नाचत आला

बाप्पा, आपली वाट पाहाता पाहाता अगदी थकल्यासारखं झालंय. डीजे, डॉल्बीच्या आवाजानं कानठळ्या बसल्या! छातीत धडधड झालीय. सर्वांग थरथरलं. लेझरने तर डोळे दीपून गेलेत. भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या मुहूर्तावर आपण बरोबर आलात. प्लॅस्टिक ऑफ पॅरिस(पीओपी)चा प्रश्न ऐरणीवर आला असताना डीजे, डॉल्बीचा आवाज घुमायला लागला आणि लेझरचा प्रकाशही डोळे दीपवू लागला, तेव्हाच आपल्या आगमनाची चाहूल लागली होतीच. बाप्पा, यंदा आपल्याला त्रास होऊ शकतो बरं का. त्रास झालाच तर माफी असावी. आपण दरवर्षी येताच. आपण नाचतच येता असा भास कैक वर्षांपासून होत असतो म्हणून यंदा गणपती माझा नाचत आला, हे जुनं गाणं सहजच आठवलं. ताशाचा आवाज तारारारा झाला रं; ही एक ओळ गाण्यात आहे. बाप्पा, ‘ताशा’ आता पाहिलाच कुठं? आता डीजे, डॉल्बीच्या आवाजाचा दणदणाट, ठणाणा आहे. आवाजाने कानठळ्या बसतात, कान बधिर होतात, सर्वांगाची थरथर होते. छातीत धडधड होते, ठोके वाढतात, लहान मुले, वृद्ध, आजारी माणसांची अवस्था सहन होत नाही, सांगता येत नाही अशी होऊन जाते. दादफिर्याद करायची म्हटली तर कानाखालीच आवाज निघण्याची भीती वाटतेय बाप्पा! बरं असो. येताना कानठळ्या बसल्या नाहीत ना, थरथर झाली नाही ना, छातीत धडधड झाली ना? त्रास झाला असेल तर माफ करा! विषयांतर झालं, बाप्पा, आपण बोअर तर झाला नाही ना? झाला असाल तर माफ करा! बाप्पा, यंदा मोदक-लाडवांचा गोडवा कमीच असणार बरं का. साखरेचा ऊस इथेनॉल म्हणजे ई-20 पेट्रोलसाठी कंपन्यांनी वापरल्याने साखरेचे उत्पादन कमालीचे घटले. साखर मिळेनाशी झालीय, महाग झालीय. बरं साखर मिळेल थोडीफार, पण मोदक-लाडू करायचे म्हटले तर गॅसही जपून वापरण्याचा वरतून सल्ला आहे. गॅसही वाचवू, पण खाद्यतेलही जरा कमीच वापरण्याचाही सल्ला. सांगा बाप्पा आता, साखर नाही, गॅस कमी, खाद्यतेल कमी, जीडीपी वाढल्याचा आनंद असला, तरी महागाई वाढल्याचे दु:ख सोसवत नाही. मग, मोदक-लाडवांना आणि प्रसादाला गोडवा कसा येणार? बाप्पा, एक सांगायचं राहिलं, ते म्हणजे महाप्रसाद करायचा म्हटलं, तर परवानगी घ्यावी लागणार आणि परत तपासणी. काय करावं बाप्पा? बरं बाप्पा, एक गोष्ट सांगायची राहिलीय. यंदा एल-निनोमुळे पाऊस कमी पडला, तरी धरणे थोडीफार भरली, ही आपलीच कृपा म्हणायची. बरं दुसरं महत्त्वाचं म्हणजे पावसाने ओढ दिल्याने बळीराजा दुष्काळाच्या सावटाखाली आहे, त्याचं काही चुकलं तर माफ करा. साखर नसल्याने तोंड कडू, त्यात कांद्याने डोळ्यांत पाणी आणलंय. चातुर्मास असल्याने तशी आताच कांद्याची गरज नाही, तेवढं तरी बरं. असो. यंदा आपण 12 दिवसांसाठी आला आहात. एकाच जागी बसून राहा बरं का. नाहीतर म्हणाल की, जरा विश्वभ्रमण करून येतो. तसा विचार अजिबात करू नका. विमानाने विदेशात जाऊ नये, अशी दिल्लीश्वरांची सूचना आहे. काटकसर करायची आहे. बाप्पा, आपण येणार म्हणून काहीतरी सोनंनाणं घेण्याचा विचार होता, पण काय करणार? नाहक सोनं खरेदी करायची नाही, ही सूचनाही आडवी आली. बाप्पा, आपणही सोनं खरेदी करण्याचा विचार करू नका बरं का? पुढच्या वर्षी या तेव्हा विश्वभ्रमण करूया आणि सोनंही खरेदी करू! महागाई असो वा नसो दुष्काळाला, तरी बाप्पा आपले स्वागत करावेच लागते. आपण विघ्नहर्ता असल्याने पूजाअर्चा करावीच लागते, परिस्थिती कशीही असो, बाप्पा आपले भक्तिभावाने स्वागत!
तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता
अवघ्या दीनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा ।
करी भक्षण आणि रक्षण
तूच पिता, तूच माता
बाप्पा मोरया रे…

Bappa Morya Re…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *