मध्यरात्री गंगापूर रोडवरील झाडे कापली

सीसीटीव्हीत संशयित कैद

नाशिक : प्रतिनिधी
गंगापूर रोडवरील रस्त्याच्या कडेला असलेली काही झाडे अज्ञात संशयितांनी मध्यरात्री मशिनने कापल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीतून समोर आला आहे. या प्रकरणावरून महापालिका प्रशासनाकडून संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेची चौकशी करून नियमानुसार संशयितांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी म्हटले आहे. मात्र, या प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
काका का ढाबा ते बॉबीज हॉटेलदरम्यान संशयितांनी झाडांची कत्तल केली. सकाळच्या सुमारास ही बाब काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर याबाबत त्यांनी महापालिका प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर प्रशासनाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात झाडे तोडण्यासाठी वापरण्यात आलेले छोटा हत्ती वाहन स्पष्टपणे दिसत आहे. या वाहनाचा क्रमांक एमएच 15-5838 असा आहे. त्यामुळे अवैधरीत्या वृक्ष तोडणार्‍यांपर्यंत पोहोचता येणार आहे. शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री अंदाजे 2 ते 3 वाजेच्या दरम्यान काही ठिकाणी झाडांची अनधिकृतपणे छाटणी करण्यात आली.
दरम्यान, झाडे तोडण्यामागचा हेतू काय, असा सवाल वृक्षप्रेमींकडून उपस्थित केला जातो आहे.
शहरातील रस्त्यांच्या सुशोभीकरणासह पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे संरक्षण महत्त्वाचे असताना, रात्रीच्या वेळी परवानगीशिवाय झाडांची छाटणी आणि तोड करण्यात आल्याने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. सदर प्रकरणातील सशयिताविरोधात कायदेशीर कार्यवाही सुरू असून, महापालिकेमार्फत लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Trees on Gangapur Road cut down at midnight.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *