रविशंकर मार्गावरील घटना; ठेकेदाराच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
सिडको : प्रतिनिधी
नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक 30 मधील 100 फुटी रस्त्यावरील रविशंकर मार्ग येथे खोदकाम करताना जेसीबीचा धक्का लागून पिण्याच्या पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटल्याची घटना रविवारी (दि. 20) सकाळी घडली. वाहिनी फुटल्यानंतर मोठ्या दाबाने पाणी बाहेर पडत राहिल्याने तब्बल तीन तास रस्त्यावर पाण्याचा प्रवाह सुरू होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाया गेले.
खोदकाम सुरू करण्यापूर्वी भूमिगत जलवाहिन्यांची माहिती घेणे आणि महापालिकेच्या संबंधित विभागाशी समन्वय साधणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. जेसीबीचे खोदकाम सुरू असतानाच जलवाहिनीला धक्का लागला आणि काही वेळातच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावरून पाण्याचा जोरदार प्रवाह वाहत होता. परिस्थिती लक्षात आल्यानंतर घटनास्थळी काम करणार्या मजुरांनीही सुरक्षित ठिकाणी जाणे पसंत केले. दरम्यान, नागरिकांनी संबंधित यंत्रणेला घटनेची माहिती देत घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दुरुस्तीची कार्यवाही सुरू होईपर्यंत मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी ड्रेनेजच्या चेंबरमध्ये वाहून गेले.
पाणीबचतीबाबत सातत्याने जनजागृती केली जात असताना महापालिका हद्दीतच निष्काळजीपणामुळे हजारो-लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जाणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर आर्थिक दंडाची कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी खोदकामाच्या ठिकाणी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी होत आहे.
घटनेची महापालिकेने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाया गेले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावून नुकसानीची भरपाई व दंड वसूल करावा. गणेशोत्सव काळात खोदकामासंदर्भात असलेल्या
निर्देशांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
खोदकामाला परवानगी होती का?
पावसाळ्याच्या कालावधीत विविध विकासकामे सुरू असतानाच सिंहस्थाच्या अनुषंगाने विविध यंत्रणांकडून कामे केली जात आहेत. त्यात गणेशोत्सवाच्या कालावधीत पंधरा दिवस खोदकाम बंद ठेवण्याचे निर्देश असताना रविशंकर मार्गावर प्रत्यक्षात खोदकाम सुरू कसे राहिले, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
वडाळागावाच्या पाणीपुरवठ्यावर परिणामाची शक्यता
फुटलेली जलवाहिनी चड्डा पार्क जलकुंभाशी संबंधित असल्याने त्याचा परिणाम वडाळागावाच्या पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने सुरू केले आहे. मात्र, दुरुस्तीच्या कालावधीत नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Water pipeline bursts after being hit by JCB; lakhs of litres of water wasted in three hours.