सिन्नर ः प्रतिनिधी
दारू पिऊन घरी आलेल्या पतीने पत्नीसह मुलाला त्रास द्यायला सुरू केल्याने राग अनावर झालेल्या पत्नीने तीक्ष्ण हत्याराच्या सहाय्याने पतीचा खून केल्याची घटना सरदवाडी मार्गावरील ढोकेनगरात घडली. पत्नीने गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.
लक्ष्मण बबन गाजरे (40) असे मृत पतीचे नाव आहे. गाजरे टेलरींग व्यवसाय करतात. रविवारी (दि 12) मध्यरात्रीच्या सुमारास लक्ष्मण गाजरे दारु पिऊन घरी आल्यावर पत्नी नंदा व त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. वाद विकोपाला गेल्यावर नंदा हिने हातोडी सारख्या टणक हत्याराने लक्ष्मण गाजरे यास छातीवर, हातापायावर मारहाण केली त्यातच लक्ष्मण याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
राजू बबन गाजरे यांनी पोलिसात नंदा गाजरे यांच्या विरोधात फिर्याद दिली. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ तांबे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक निरीक्षक विजय माळी, उपनिरीक्षक सचिन चौधरी, हवालदार नवनाथ पवार, चेतन मोरे, राहुल इंगोले, साळवे यांनी घटनेची माहिती घेत नंदा गाजरे हिला ताब्यात घेऊन अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी पुढील तपास करीत आहेत.