बनावट दस्त तयार करून कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न

सिडको : प्रतिनिधी
मृत व्यक्तीच्या नावाने बनावट स्वाक्षरी करून कोट्यवधी रुपये किमतीची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे व त्याचा वापर करणे यांसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित प्रकाश पोपटराव खैरे (वय 48, रा. नांदूर नाका, माडसांगवी) याला पोलिसांनी अटक केली आहे. नीलेश कमलसिंग धिंगाण आणि राम नेनुमल कटारिया (दोघे रा. नाशिकरोड परिसर) अशी अन्य संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पुणे येथील वकील अभिजित सतीश खांडरे (वय 29) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या वडिलांच्या मृत्यूचा गैरफायदा घेऊन जमीन बळकावण्याच्या उद्देशाने संशयितांनी संगनमत केल्याचा आरोप आहे. संशयित प्रकाश खैरे याने निखिल बागूल याच्या माध्यमातून ज्योती जीवन हिरे यांच्याकडून मुद्रांक खरेदी केला. त्यानंतर फिर्यादीच्या वडिलांची मृत्यूनंतर खोटी स्वाक्षरी करून नीलेश धिंगाण आणि राम कटारिया यांच्या संगनमताने बनावट विसार पावतीचा दस्त तयार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
हा बनावट दस्त खरा असल्याचे भासवून जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच, हा दस्त बनावट असल्याची माहिती असूनही तो दि. 17 मार्च 2025 रोजी मंडळ अधिकारी, देवळाली यांच्या कार्यालयात लेखी हरकत अर्जासह सादर करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मंडळ अधिकारी देवळाली यांच्या कार्यालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान बनावट दस्ताचा वापर करून फिर्यादीची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. संबंधित जमीन कोट्यवधी रुपये किमतीची असल्याने या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, प्रकाश खैरे याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख आणि पोलिस उपनिरीक्षक माळी तपास करीत आहेत.

Attempt to usurp land worth crores by creating forged documents in the name of a deceased father; case registered against three individuals.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *