उपनगर पोलिसांची कामगिरी; 1.33 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एक संशयित फरार
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
घर बंद असल्याची संधी साधून घरफोडी करणार्या टोळीचा उपनगर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत छडा लावला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून लॅपटॉप, प्रिंटर, टीव्ही, सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आणखी एक संशयित फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांनी दिली
आनंद रमेश धिवरे हे पत्नीसमवेत गुजरातमध्ये मुलाला भेटण्यासाठी गेले होते. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2026 या कालावधीत त्यांचे घर बंद होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांनी गुन्हेशोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. दरम्यान, पोलिस अंमलदार जयंत शिंदे यांना चोरीचा लॅपटॉप विक्रीसाठी दोन संशयित विजय-ममता सिग्नल परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
त्यानुसार 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पोलिसांनी परिसरात सापळा रचला. पोलिसांना पाहून संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिस पथकाने पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या लॅपटॉपबाबत चौकशी केली असता, त्यांनी एलआयजी सोसायटी परिसरात चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक केलेल्या संशयितांची नावे मयूर विजय सोनवणे (रा. राहुलनगर, विजय-ममता परिसर) आणि कमलेश प्रदीप केदारे (रा. एलआयजी सोसायटी, शिवाजीनगर) अशी आहेत. त्यांच्यासोबत सौरभ साटोटे आणि एका विधिसंघर्षित बालकाचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून लॅपटॉप, कॅनन प्रिंटर, संगणक मॉनिटर, पॅनासॉनिक टीव्ही, सोन्याचे कानातले, चांदीचे दागिने, गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पितळी मूर्ती, गॅस सिलिंडरची टाकी, पंप, इस्त्री, व्हिडिओ इंटरकॉम किट आणि इतर साहित्य अशा एकूण 26 वस्तू जप्त केल्या आहेत.
जप्त मुद्देमालाची एकूण किंमत एक लाख 33 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले. या गुन्ह्यातील सौरभ साटोटे फरार असून, त्याच्याविरुद्ध घरफोडी, चोरी आणि जबरी चोरीसारखे गुन्हे करण्याची सवय असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचा शोध सुरू आहे.
या कारवाईमुळे उपनगर पोलिस ठाण्यातील घरफोडीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त किशोर काळे आणि सहायक पोलिस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे, पोलिस निरीक्षक शांताराम डंबाळे, पोलिस निरीक्षक सुनील बडे तसेच उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, शशिकांत पवार, गुन्हे शोध पथकातील हवालदार संदीप पवार, विनोद लखन, भामरे, गौरव गवळी, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, प्रशांत देवरे, पंकज कर्पे, सूरज गवळी, संदेश रघतवान, योगेश जाधव यांनी ही कामगिरी केली.
Theft after breaking into a locked house; two arrested within 24 hours.