पहिल्याच माळेला भाविकांची मांदियाळी; देवीच्या आभूषणांची मिरवणूक
सप्तशृंगगड : प्रतिनिधी
आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर आई भगवतीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारी (दि. 11) अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच माळेला हजारो भाविकांनी गडावर गर्दी करत श्री भगवतीचे दर्शन घेतले.
घटस्थापना आणि रविवारची सुट्टी असा दुहेरी योग जुळून आल्याने गडावर भाविकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. घटस्थापनेच्या पूर्वसंध्येपासूनच ज्योत घेऊन आलेल्या भाविकांमुळे संपूर्ण गड परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी धार्मिक विधींना पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली. रविवारी सकाळी सात वाजता विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा धर्मादाय सहआयुक्त विवेक सोनवणे यांनी सपत्नीक देवीच्या आभूषणांचे पूजन केले. यानंतर पुरोहितांना वर्णी दक्षिणा देण्यात आली आणि विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयातून देवीच्या आभूषणांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांचा गजर, देवीचा जयघोष आणि भाविकांचा उत्साह यामुळे संपूर्ण गडावर मंगलमय वातावरण निर्माण झाले. यानंतर मुख्य धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती आणि नाशिकचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश राहुल रोकडे यांनी सपत्नीक श्री भगवतीच्या पहिल्या माळेची पंचामृत महापूजा केली. विधिवत मंत्रोच्चार व धार्मिक विधींच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. महापूजेनंतर श्री भगवती मंदिरात घटस्थापना करण्यात आली आणि अशा प्रकारे शारदीय नवरात्रोत्सवाला अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या धार्मिक सोहळ्याप्रसंगी धर्मादाय कार्यालयाचे अधीक्षक विशाल जाधव, निरीक्षक हरिहर गाडगे, निरीक्षक अत्तरदे, विशाल सपकाळ, विश्वस्त संस्थेचे पदाधिकारी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, शाम पवार आणि मंदिर पर्यवेक्षक सुनील कासार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाविकांची वाढती गर्दी
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांचा वाढलेला ओघ, मंदिर परिसरातील भक्तिमय वातावरण आणि धार्मिक विधींचा उत्साह यामुळे सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवास दिमाखदार सुरुवात झाली आहे. आगामी दिवसांतही आई भगवतीच्या दर्शनासाठी भाविकांची अशीच मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Awakening of the primal power at Saptashringgad