‘ठक्कर राघवजी देवजी लोहाणा महाजनवाडी’
वर्ल्डक्लास कम्युनिटी सेंटर
– सचिन अहिरराव
समाज म्हणजे केवळ अस्मितेचे हुंकार किंवा स्वतःच्या श्रेष्ठत्वाची द्वाही मिरवणे नव्हे, तर परस्परांना साथ देत, तन-मन-धनाने योगदान देत समाजाला उन्नतीकडे घेऊन जाणे, हे तत्त्व अंगी बाणवून लोहाणा समाजाची वाटचाल सुरू आहे. ‘सूर्यवंशो विजयते’ या ब्रीदवाक्यातून व्यक्त होणारा गौरवशाली वारसा आणि त्याला कर्तृत्वाची, सेवाभावाची व सामाजिक एकजुटीची जोड देणारा हा प्रवास आहे. त्यातीलच एक दमदार पाऊल म्हणजे नाशिकमध्ये उभं राहिलेलं ‘ठक्कर राघवजी देवजी लोहणा महाजनवाडी’ हे वर्ल्डक्लास कम्युनिटी सेंटर. आज (दि. 11 ऑक्टोबर) स्वाध्याय परिवाराच्या पूज्य दीदी अर्थात, धनश्री तळवलकर यांच्या हस्ते आकाशवाणी परिसरातील स्वामी विवेकानंद रस्त्यावरील ही वास्तू आज समाजाला समर्पित होत आहे. या सेंटरमधील मातोश्री कानबाई सत्कार्य हॉलचे उद्घाटन महेंद्रभाई घेलाणी आणि नाशिक लोहाणा महाजन कार्यालयाचे उद्घाटन लोहाणा महापरिषदेचे अध्यक्ष सतीशभाई विठलाणी यांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्त…
रशिया-युक्रेन युद्ध भडकलेलं होतं. बॉम्बवर्षाव सुरू होता. जीव वाचवण्यासाठी लोक बंकर्समध्ये लपून बसले होते. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेला एक भारतीय विद्यार्थीही अशाच एका बंकरमध्ये अडकून पडला होता. त्याचे पालक गुजरातच्या पोरबंदरमध्ये. त्यांच्याशी त्याने कसाबसा संपर्क साधला आणि परिस्थिती कळवली. त्या पालकांनी ही माहिती त्यांच्या समाजातील ज्येष्ठ म्हणून नाशिकच्या जितूभाई ठक्कर यांना कळवली. दर एकादशीला त्या समाजाचे जगभरातील अनेक लोक आध्यात्मिक संस्कार केंद्रानिमित्त झूमकॉलद्वारे ऑनलाइन एकत्र येतात. तेव्हा जितूभाईंनी त्या पालकांची व्यथा मांडली. त्याच झूमकॉलमध्ये अमेरिकेतून मधुसूदन ठक्कर हेही सहभागी झाले होते. त्यिांनी झूमकॉल संपल्यावर जितूभाईंशी संपर्क साधत त्या विद्यार्थ्याची माहिती घेतली आणि लगोलग स्वामीनारायण संप्रदाय आणि त्यांचं वैयक्तिक नेटवर्क वापरून भारतीय दूतावासाची मदत घेत त्या विद्यार्थ्यासाठी बंकरपर्यंत बुलेटप्रूफ कार, तिथून भारतापर्यंत विमानप्रवासाची सोय केली. तो विद्यार्थी पालकांपर्यंत पोहोचेपर्यंत मधुसूदनभाई एकीकडे सगळी तजवीज आणि दुसरीकडे देवापाशी प्रार्थना करत राहिले.
पोरबंदर-युक्रेन-नाशिक-अमेरिका या सगळ्या बिंदूंना एकत्र जोडणारा एक समान धागा इथे होता; तो म्हणजे लोहाणा समाजाचा. लोहाणा समाजाचा इतिहास शौर्य, स्थलांतर आणि व्यावसायिक यशाने भरलेला आहे. लोहाणा समाज
स्वतःला ’सूर्यवंशी’ म्हणवून घेतो. पौराणिक मान्यतेनुसार, हा समाज भगवान श्रीरामांचे पुत्र ’लव’ यांचे वंशज मानला जातो. ’लव’च्या वंशजांना ’लुवाणम’ म्हटले गेले, ज्याचे पुढे रूपांतर ’लोहाणा’मध्ये झाले. हा समाज प्रामुख्याने गुजरात, कच्छ, सौराष्ट्र, महाराष्ट्र आणि सिंध प्रांतातून आलेल्या निर्वासित कुटुंबीयांमध्ये आढळणारा हा समाज जगभरातील छत्तीसहून अधिक देशांमध्ये स्थिरावला आहे. नाशिकमध्येही या समाजाची सुमारे सहाशे घरे आहेत. एक प्रतिष्ठित, उद्योजक आणि व्यापारी समाज म्हणून या समाजाने आपली ओळख प्रस्थापित केली आहे. ऋजुतापूर्ण व सौजन्यशील वागणूक, तीक्ष्ण व्यावसायिक बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा, दानशूर वृत्ती, धार्मिकता, लवचिकता अशा गुणवैशिष्ट्यांमध्ये सर्वाधिक लक्षणीय ठरते ती या समाजाची कौटुंबिक आणि सामाजिक एकजूट! वरची घटना हीदेखील तेच अधोरेखित करते.
उद्यमशीलता हा स्थायीभाव असलेल्या लोहाणा समाजातील अनेक लोक विविध क्षेत्रांमध्ये प्रगतीच्या शिखरावर आहेत. त्याचवेळी समाजातील काही घटक अप्रगत, तर काही प्रगतिशीलतेच्या वाटेवर आहेत. त्यांच्या वाटचालीला बळ देणे, त्यांना हात देणे आणि एकंदरीत समाजाला अधिकाधिक उन्नत करणे यासाठी लोहाणा समाजातील धुरीण तन-मन-धनाने कार्यरत आहेत. त्यासाठी त्यांचं माध्यम आहे ‘लोहाणा महापरिषद’. ही संस्था वैश्विक, राष्ट्रीय, प्रादेशिक, राज्य, जिल्हा आणि शहर अशा पातळ्यांवर विविध उपक्रम राबवत असते.
महापरिषदेचे सध्याचे अध्यक्ष सतीशभाई विठलानी असून, नाशिकचे जितूभाई ठक्कर या संस्थेचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान विश्वस्त आहेत. ही केवळ एक सामाजिक संस्था नसून, ती लोहाणा समुदायातील प्रत्येक व्यक्तीला शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करणारी एक मजबूत आधारप्रणाली आहे. नाशिकमध्ये उभं राहिलेलं ‘ठक्कर राघवजी देवजी लोहणा महाजनवाडी’ हे कम्युनिटी सेंटर त्याच्या विविध वैशिष्ट्यांमुळे यापुढे महापरिषदेचं एक महत्त्वाचं केंद्र ठरणार आहे
समाजातील अनेक महिला या उद्योजकता जोपासण्याची धडपड करतात. त्यांना त्यांच्या कामात अधिक कौशल्य विकसित करण्यासाठी, व्यावसायिक संधी या ‘लोहाणा महाजनवाडी’द्वारे उपलब्ध करून दिल्या जातील. लोहाणा समाजातील ‘लग्नसेतू’ हा एक अनोखा उपक्रम. लग्न ठरवतेवेळी दोन्हीकडच्या स्थळांना परस्परांची योग्य माहिती मिळावी म्हणून हा उपक्रम राबवला जातो. त्यात समाजातील प्रत्येकी दहा कुटुंबांशी एकजण जोडला जातो आणि संपर्कात राहतो. त्याच्याकडून त्या कुटुंबातील वधू अथवा वराची निश्चित माहिती संबंधितांना मिळते. प्रामुख्याने व्यावसायिक असलेल्या लोहाणा समाजातील सत्तर जण दर महिन्याला एकत्र येऊन व्यवसायवृद्धीबाबत चर्चा करतात. ते आता वेगवेगळ्या हॉटेल्सऐवजी इथे भेटतील.
सध्या मुलं प्रामुख्याने इंग्रजी माध्यमातून शिकत असल्याने मातृभाषेपासून दुरावत चालली आहेत. घरात गुजराती बोलली जात असली, तरी या मुलांची लेखन आणि वाचनकौशल्ये हवी तशी विकसित होत नाहीत. ही कमतरता दूर करण्यासाठीही या सेंटरमध्ये उपक्रम राबवला जाणार आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडिया, पालकांना वेळेची कमतरता अशामुळे मुले संस्कृती विसरत चाललेली आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षभरात समाजातील सर्व घरांत त्रिकालसंध्या, यमुनाष्टक आणि समाज रामाचा वंशज असल्याची आठवण म्हणून रामरक्षा मुखोद्गत करून घेतली जाणार आहे. या श्लोकांचे केवळ पाठांतर नव्हे, तर त्यामागील कार्यकारणभावही समजून दिला जाणार आहे. या समाजाचं स्वाध्याय परिवाराशी असलेलं नातं यातून अधोरेखित होतं. समाजातील विद्यार्थांना शिक्षण, प्रवेश, आर्थिक मदत, होस्टेल आदी मुद्द्यांवर महापरिषद काम करतच असते. त्याला या सेंटरमधून गती दिली जाईल. समाजातील संत ठक्करबाप्पा यांनी आदिवासींसाठी सुरू केलेल्या शाळांनाही या सेंटरमधून आधार दिला जाणार आहे. याशिवाय नवरात्र, चैत्र शुद्ध द्वीजेला होणारा महाप्रसाद, दिवाळी मिलन अशा विविध कार्यक्रमांसाठी आता ही ‘ठक्कर राघवजी देवजी लोहाणा महाजनवाडी’ लोहाणा समाजाला हक्काचं घर ठरणार आहे.
(लेखक दै. गांवकरीचे कार्यकारी
संपादक)
मनोहरदास ठक्कर (भाई) यांनी केली जमीन समर्पित
आकाशवाणी परिसरातील स्वामी विवेकानंद रस्त्यावरील सुमारे 2700 वार जागा मनोहरदास ठक्कर (भाई) यांनी समाजाला समर्पित केली होती. त्याच जागेवर प्रसंगानुरूप मंडप घालून समाजाचे विविध उपक्रम होत असत. मात्र, आता तिथे हे भव्य आणि जागतीक दर्जाचं कम्युनिटी सेंटर उभं राहिलं आहे. त्यात सुमारे 350 आसनक्षमतेचे सात हजार स्केवअर फुटांचे एक प्रशस्त सभागृह, दोन हजार स्केअर फुटांचा एक लहान हॉल, कार्यालय, आणि पाहुण्यांच्या निवासासाठी चार उत्तम रूम यांचा समावेश आहे. पुढील टप्प्यात पहिल्या मजल्यावरही एक सभागृह आणि अजून वीस रूमस उभारण्याचे नियोजन आहे. आर्किटेक्ट संजय पाटील आणि संजय पाबरी या कम्युनिटी सेंटरचे वास्तुविशारद आहेत. लोहाणा समाजाच्या विविध उपक्रमांव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमासाठीही उपलब्ध
करून दिले जाणार असल्याने गंगापूर रोड परिसरातील संस्था आणि नागरिकांना एक उत्तम पर्यायही निर्माण झाला आहे.
‘Suryavansho Vijayate’