जिल्हाधिकार्यांकडे महापालिकेची पत्राद्वारे मागणी
नाशिक : प्रतिनिधी
राज्यात यंदा अल निनोमुळे सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने राज्य शासन सावध झाले आहे. येत्या शुक्रवारपासून (दि. 16 ऑक्टोबर) राज्यात 10 टक्के पाणीकपातीचेे निर्देश दिले आहेत. दरम्यान, महापालिका प्रशासनाने नाशिककरांसाठी आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आठ टीएमएसी पाण्याची मागणी जिल्हाधिकार्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
महापालिकेने 15 ऑक्टोबर 2026 ते 31 ऑगस्ट 2027 या कालावधीत शहरासाठी 7,370 द.ल.घ. फू. व कुंभपर्वासाठी 625 दलघफू अशी एकूण आठ टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. यात 1 ते 31 ऑगस्ट 2027 या एक महिन्यासाठी 970 द.ल.घ.
फू. जादा पाण्याची मागणी नोंदवली आहे. मागील वर्षी महापालिकेने 6,400 द.ल.घ.फू. इतके आरक्षण मागितले होते. धरणात मुबलक साठा असल्याने हा पाणी आरक्षण कोटा मंजूर करण्यात आला; परंतु पुढील हंगामासाठी महापालिकेने यंदा दीड टीएमसी जादा पाण्याची मागणी केली आहे. पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होणार असून, अमृतस्नान, साधुग्राम व भाविक यांच्यासाठी 625 द.ल.घ.फु जादा पाण्याची मागणी केली आहे. अल निनो संकटामुळे पुढील वर्षी पर्जन्यमान कमीच राहण्याची भीती व्यक्त केली आहे. अल निनो संकटाचा धोका पाहता धरणातील उपलब्ध जलसाठा 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पुरविण्याची कसरत करावी लागेल. नाशिक महापालिकेने मागणी केलेल्या 7,300 द.ल.घ.फू. पाणी आरक्षण फेटाळल्यास व कमी पाणी मंजूर झाल्यास नाशिक महापालिकेला पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागेल. यंदा जुलै व ऑगस्टमध्ये नाशिक शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिककरांची वर्षभराची पाण्याची तहान भागली. नाशिकमधील पावसामुळे जायकवाडी धरणदेखील ओव्हरफ्लो झाले होते.
पालकमंत्र्यांच्या पाणी आरक्षण बैठकीकडे लक्ष
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 15) बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे नाशिकचे लक्ष लागले आहे. शहरासाठी किती पाणी मंजूर करायचे यावर बैठकीतच शिक्कामोर्तब केले जाईल.
यानुसार केली मागणी
गंगापूर- 5 हजार 440 (दलघफू)
दारणा धरण- 230
मुकणे धरण- 570
महापालिकेने केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या मागणीपेक्षा कमी पाणी मंजूर झाल्यास 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी पुरविण्यासाठी कपात केली जाऊ शकते. पण याबाबतचा अंतिम निर्णय पालकमंत्रीच घेतील. महापालिकेने आठ टीएमसी पाण्याची मागणी केली आहे.
– रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा
Nashik requires 8 TMC of water.