धर्मांतरासाठी दबाव, संशयितास अटक
विहितगाव परिसरातील खळबळजनक घटना
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणासह धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून तीन वर्षांपासून अत्याचार केल्याचा, तसेच पीडितेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचा आरोप संशयित नोमाण मुख्तार अन्सारी (रा. ईश्वर संकल्प बिल्डिंग, विहितगाव) याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनगर पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.
पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, 2022 पासून त्यांचे कुटुंब विहितगाव परिसरात राहत असताना मुलीची ओळख इमारतीत राहणार्या नोमाण अन्सारी याच्याशी झाली. ओळखीचा फायदा घेत त्याने मुलीशी मैत्री केली. पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे मुलीने आईला सांगितले. संशयित तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगत असून, लग्न करून दिल्लीला घेऊन जाण्याचे आश्वासन देत असल्याचेही आईच्या निदर्शनास आले. मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या आई-वडिलांनी संशयिताच्या कुटुंबीयांना भेटून त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही त्याचा मुलीशी संपर्क सुरूच राहिल्याचा आरोप आहे. त्याच्या त्रासाला कंटाळून कुटुंबाने फेब्रुवारी 2025 मध्ये विहितगाव येथील घर सोडून टाकळीतील समतानगर परिसरात राहायला जाण्याचा निर्णय घेतला.
तक्रारीनुसार, संशयिताने मुलीला विश्वासात घेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. घरात कोणी नसताना तसेच इमारतीच्या मागील अंधार्या जागेत त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे मुलीने आईला सांगितले.
5 ऑक्टोबर रोजी टाकळी परिसरात मुलगी संशयिताशी बोलत असल्याचे तिच्या आईला दिसले. आईने जाब विचारला असता, मुलीला पत्नी मानत असल्याचे आणि तिचे धर्मांतर करून लग्न करणार असल्याचे संशयिताने सांगितल्याचा आरोप आहे. मुलीने धर्मांतर न केल्यास तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकीही त्याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. इतकेच नव्हे, तर मुलीच्या कुटुंबीयांनीही इस्लाम धर्म स्वीकारावा, हिंदू धर्मातील पूजापद्धती सोडाव्यात आणि मुलीने हिजाब घालावा, नमाज पठण करावे, अशा स्वरूपाचा दबाव टाकल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मुलीच्या मोबाइलमध्ये मुस्लिम पेहरावातील फोटो, नमाज पठणाचे व्हिडिओ आणि इतर छायाचित्रे आढळल्याचे आईने सांगितले.
मुलीने सांगितलेली हकीकत ऐकल्यानंतर आईने उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गुन्हा नोंदवून संशयिताला अटक केली आहे. कथित लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पोक्सो कायद्यानुसारही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बडे पुढील तपास करीत आहेत.
फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
मुलीचे फोटो आणि व्हिडिओ काढून ठेवत, विरोध केल्यास ते व्हायरल करून मुलीची आणि तिच्या कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. 15 सप्टेंबर 2026 रोजी रात्री आठच्या सुमारास इमारतीजवळील अंधार्या जागेत बोलावून फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
Sexual assault on a minor girl