नाशिकला स्वतंत्र टपाल क्षेत्र

ना. छगन भुजबळांच्या प्रयत्नांना यश

नाशिक : प्रतिनिधी
उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र नाशिक टपाल क्षेत्र स्थापण्याच्या प्रस्तावाला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. टपाल विभागाने 12 ऑक्टोबर 2026 रोजी या संदर्भातील अधिकृत ज्ञापन जारी केले. मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. या निर्णयामुळे नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव आणि भुसावळ या पाच टपाल विभागांचे कामकाज एकाच प्रादेशिक कार्यालयांतर्गत येणार आहे.
यापूर्वी नाशिक आणि मालेगाव हे विभाग नवी मुंबई टपाल क्षेत्राशी, तर धुळे, जळगाव आणि भुसावळ हे छत्रपती संभाजीनगर टपाल क्षेत्राशी संलग्न होते. उत्तर महाराष्ट्रातील या विभागांचे प्रशासन एकत्रित करण्यासाठी स्वतंत्र टपाल क्षेत्राची मागणी करण्यात आली होती.
मंत्री भुजबळ यांनी 27 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय दळणवळणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र पाठवून ही मागणी केली होती. त्यानंतरही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर केंद्राने या प्रस्तावाला मंजुरी दिली.
नव्या व्यवस्थेनुसार, उत्तर महाराष्ट्रातील 230 टपाल कार्यालये आणि 1,506 शाखा टपाल कार्यालयांचे संचालन नाशिकमधून होणार आहे. हे प्रादेशिक कार्यालय नाशिकमधील टपाल विभागाच्या विद्यमान इमारतीत सुरू करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे टपाल सेवांचे नियोजन, पार्सल हाताळणी, वितरण व्यवस्था आणि विविध विभागांतील निर्णयप्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होईल. कृषी, उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्राचा विस्तार होत असताना उत्तर महाराष्ट्रातील मालवाहतूक व पार्सल सेवांचे महत्त्व वाढत आहे. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र टपाल क्षेत्रामुळे ग्रामीण आणि शहरी भागांतील टपाल कार्यालयांमधील समन्वयाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
स्वतंत्र नाशिक टपाल क्षेत्राच्या मंजुरीबद्दल मंत्री भुजबळ यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय दळणवळणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले. या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील टपाल व्यवस्थेला स्वतंत्र प्रशासकीय ओळख मिळाली आहे. सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी मदत होणार आहे.

 

Separate Postal Region for Nashik

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *