♦ समुद्रात पेरलेल्या सुरुंगामुळे मालवाहू जहाजाला जलसमाधी
♦ 2,500 कंटेनर समुद्रात, जागतिक पुरवठा साखळी धोक्यात
नवी दिल्ली/दुबई
जगाच्या एक पंचमांश तेल आणि गॅस वाहतूक होणार्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत बुधवारी सकाळी मोठा स्फोट झाला. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने सांगितले की, अनधिकृत आणि धोकादायक मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणारे एक कंटेनर जहाज नौदल सुरुंगाला धडकून पेटले आणि दक्षिण होर्मुझच्या पाण्यात बुडाले. या मालवाहू जहाजाला जलसमाधी मिळाल्याने 2,500 कंटेनर समुद्रात वाहून गेले. यामुळे जागतिक पुरवठा साखळी धोक्यात आली आहे.
आयआरजीसीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एक उल्लंघन करणारे कंटेनर जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून अनधिकृत मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत होते. ते नौदल सुरुंगावर आदळले. स्फोट झाला आणि आग लागली. 2,500 हून अधिक कंटेनर घेऊन जाणारे जहाज बुधवारी सकाळी आगीच्या तीव्रतेमुळे बुडाले. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात जहाज कलंडताना आणि काळ्या धुराचा मोठा लोट उठताना दिसत आहे. समुद्रात शेकडो कंटेनर तरंगताना दिसत आहेत. आयआरजीसी ने स्थानिक मच्छिमार आणि बोटींना इशारा दिला आहे की, तरंगत्या कंटेनरला धडकू नये म्हणून सावधगिरी बाळगा.
दोन जहाजांवर हल्ला, एक बुडाले
सिंगापूरच्या मेरीटाईम अँड पोर्ट अथॉरिटीने पुष्टी केली की, सिंगापूर-नोंदणीकृत दोन जहाजांवर मंगळवार-बुधवारी हल्ला झाला. जीएफएस प्राईड या जहाजाला आग लागली आणि ते बुडाले. 21 क्रू मेंबर्सना सुरक्षित बाहेर काढण्यात आले, कोणीही जखमी नाही. जीएफएस जीसेल या जहाजाच्या बॉडीचे नुकसान झाले, पण ते स्वतःच्या इंजिनवर सुरक्षित ठिकाणी पोहोचले. 22 क्रू सुरक्षित आहेत. या दोन्ही जहाजांवर सिंगापूरचे नागरिक नव्हते. जीएफएस प्राईड हेच आयआरजीसी ने सांगितलेले 2,500 कंटेनरचे जहाज आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही, पण वेळ आणि लोकेशन एकच आहे.
युद्धाचा भडका
आयआरजीसीने कालच इशारा दिला होता की, आम्ही होर्मुझवर 24 तास नियंत्रण ठेवत आहोत, अमेरिकेचे युद्धनौका जवळ आल्यास बुडवू. याला अमेरिकेच्या सेंटकॉमने प्रत्युत्तर दिले होते की, आयआरजीसी कमांडरकडे नौदलच नाही. होर्मुझवर नियंत्रण अमेरिकेचे आणि मित्र राष्ट्रांचे आहे. आम्ही कालच 1.9 कोटी बॅरल कच्चे तेल सुरक्षितपणे पुढे नेले. गेल्या 48 तासांत होर्मुझमध्ये किमान 5 जहाजांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन जहाजांवर प्रोजेक्टाईल हल्ल्याचीही नोंद झाली आहे.
Havoc in the Strait of Hormuz!