उगले मळ्यात दीड वर्षाच्या मादीला पकडले; दुसर्या बिबट्याचा वावर कायम असल्याने नागरिकांमध्ये धास्ती
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर शहर आणि परिसरात बिबट्यांचा वाढता वावर रोखण्यासाठी वनविभागाने सुरू केलेल्या पिंजरे लावण्याच्या मोहिमेत आणखी एका बिबट्याला पकडण्यात यश आले आहे.
मापरवाडी रस्त्यावरील उगले मळ्यात नगरसेवक बाळासाहेब उगले यांच्या शेतात गुरुवारी (दि. 15) पहाटे दीड वर्षाची मादी बिबट्या पिंजर्यात अडकली. गेल्या पंधरा दिवसांत पाच बिबट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. मात्र, याच परिसरात आणखी एक बिबट्या फिरत असल्याने नागरिकांची धास्ती कायम आहे. मापरवाडी रस्त्यावरील गट क्रमांक 80 मधील उगले मळा परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी तानाजी भुजबळ, वनरक्षक संतोष चव्हाण तसेच वन्यजीव बचाव पथकातील रोहित लोणारे आणि निखिल वैद्य यांनी सात ऑक्टोबर रोजी या ठिकाणी पिंजरा लावला होता. गुरुवारी पहाटे या पिंजर्यात मादी बिबट्या अडकला. वनविभागाच्या पथकाने सकाळी बिबट्याला मोहदरी वनोद्यानात हलविले.
शेतकरी, नागरिकांमध्ये भीती
सिन्नर शहरालगतच्या शेतशिवारांत बिबट्यांचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतात काम करताना तसेच रात्रीच्या वेळी प्रवास करताना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे. बिबट्यांचा वावर असलेल्या भागांत वनविभागाने गस्त वाढवावी आणि आवश्यक ठिकाणी पिंजरे लावावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दुसर्या बिबट्याचा शोध सुरू
नगरसेवक बाळासाहेब उगले यांनी यापूर्वी त्यांच्या शेतात दोन बिबटे फिरत असल्याचे मोबाइल कॅमेर्यात चित्रित केले होते. त्यानंतर या परिसरात दोन बिबट्यांचा वावर असल्याचे समोर आले होते. आता त्यापैकी एका मादी बिबट्याला जेरबंद करण्यात आले असले, तरी दुसरा बिबट्या अद्याप मोकाट असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची भीती दूर करण्यासाठी वनविभागाला या दुसर्या बिबट्याचाही शोध घ्यावा लागणार आहे.
Fifth leopard trapped in Sinnar within 15 days