जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा

नाशिक : प्रतिनिधी
स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा येथे नुकत्याच झालेल्या जागतिक महापौर परिषदेत महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी नाशिकमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळा, धार्मिक परंपरा आणि भारतीय संस्कृतीचे सादरीकरण वैश्विक मंचावर केले. दरम्यान, या परिषदेमुळे नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची चर्चा झाली. त्यानिमित्ताने शहरात होणार्‍या विकासावर सखोल चर्चा झाली, अशी माहिती महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जीनिव्हावरून परतल्यावर महापौरांचे नाशिकमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. महापौर परिषदेवरून येताच महपौर आडके यांनी रामायण या त्यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेत या परिषदेतील माहिती दिली.
महापौर पुढे म्हणाल्या, की परिषदेत रामकाल पथ आणि कुंभमेळ्याचे व्यवस्थापन यांसारख्या नाशिकमधील प्रकल्पांचे कौतुक झाले. विशेषतः ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि विशेष प्राधान्याने दिव्यांग व्यक्तींसाठी केलेली शहरी नियोजनाची कामे अत्यंत वाखाणण्याजोगी ठरली. बस स्थानकांचे व्यवस्थापन, अर्बन इन्क्लुझिव्हिटी आणि विविध क्षेत्रांतील सर्वोत्तम पद्धती यावर नाशिकच्या वतीने मांडणी करण्यात आली. परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे, तेथील काटेकोर शिस्त आणि वेळेचे नियोजन होते. प्रत्येक सत्राची सुरुवात ठरलेल्या वेळेवर झाली आणि प्रत्येकाला आपल्या मताची मांडणी करण्यासाठी दोन मिनिटांचा अवधी देण्यात आला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या स्तरावरील परिषद कशी यशस्वीपणे पार पाडता येते, याचे उत्तम उदाहरण याद्वारे पाहायला मिळाले.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय निमंत्रणामुळे आणि जागतिक पातळीवरील चर्चेमुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळा आता केवळ देशापुरता मर्यादित न राहता, जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरला आहे. जगभरातील महापौरांना नाशिकच्या कुंभमेळ्याची भुरळ पडल्यामुळे या सोहळ्याकडे आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून विशेष लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे.

जगभरातील महापौरांना सिंहस्थाचे आमंत्रण
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामांचा धडाका सुरू असताना, नाशिकच्या कुंभमेळ्याची चर्चा जागतिक पातळीवर पोहोचली आहे. महापौरांनी उपस्थित जगातील विविध महापौरांना आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये येण्याचे विशेष निमंत्रण दिले. त्यास सर्व महापौरांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांचे निमंत्रण स्वीकारले.

भारताच्या संस्कृतीचे नवे पर्व जगासमोर उलगडले
संयुक्त राष्ट्रसंघाच्या महापौर परिषदेत नाशिक आणि महाराष्ट्राच्या विकासाचा वारसा जागतिक स्तरावर पोहोचला आहे. नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी या परिषदेत सहभाग घेत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे महत्त्व, धार्मिक परंपरा आणि भारतीय संस्कृतीचे समर्थ सादरीकरण केले. आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताच्या संस्कृतीचे आणि समृद्ध परंपरेचे नवे पर्व जगासमोर उलगडले. या परिषदेमध्ये शहरी आव्हाने, शाश्वत विकास, महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक वारसा या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

वसुधैव कुटुम्बकम्चा संदेश
या परिषदेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील वसुधैव कुटुम्बकम् भावना जागतिक पातळीवर पोहोचवली आहे. भारत आगामी काळात संपूर्ण जगाला योग्य ती दिशा दाखविण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे स्पष्ट झाले आहे. जागतिक स्तरावर महिलांच्या सहभागाचे प्रमाण कमी असताना, भारतात मात्र महिलांचे प्रतिनिधित्व अग्रस्थानी आहे. आपल्या सभागृहात 60 टक्के महिला आणि 40 टक्के पुरुष अशी रचना आहे. जिजामाता व अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांवर चालणारे आपले नेतृत्व महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण असल्याचे महापौर हिमगौरी आहेर- आडके यांनी म्हटले.

A confluence of Indian culture on the global stage in Geneva

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *