भाजपाला विजयाचा ‘प्रसाद’

कॉंग्रेसचे हांडोरे पराभूत, मविआची मते फुटली; फडणवीसांचा चमत्कार

मुंबई : प्रतिनिधी
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राज्यसभेप्रमाणेच भाजपाने चमत्कार घडविला. महाविकास आघाडीची मते फोडत भाजपाने पाचवा उमेदवार निवडून आणला. राज्यसभेप्रमाणेच या निवडणुकीतही महाविकास आघाडीची मते फुटल्याचे उघड झाले. पहिल्या फेरीत शिवसेनेचे सचिन अहिर, आमशा पाडवी, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर, भाजपाचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय आणि प्रसाद लाड तर कॉंग्रेसचे भाई जगताप हे दुसर्‍या पसंतीची मते घेत विजयी झाले. पहिल्या पसंतीचा अपेक्षित असलेला कोटा पूर्ण न करता आल्याने कॉंग्रेसचे चंद्रकांत हांडोरे हे पराभूत झाले. त्यांना कॉंग्रेसने निश्‍चित केलेल्या कोट्याइतकेही मते मिळाली नाही. त्यांना अवघी 22 मते मिळाल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी सोमवारी मतदान झाले. एकूण अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख, आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार सुप्रीम कोर्टाने नाकारल्याने एकूण 285 आमदारांनी मतदान केले. भाजपाचे आ. जगताप आणि मुक्ता टिळक हे आजारी असतानाही खास ऍम्बुलन्समधून मतदानासाठी आले होते. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतमोजणीला प्रारंभ होण्यापूर्वीच कॉंग्रेसने टिळक आणि जगताप यांच्या मतदानावर आक्षेप घेतला. राज्य निवडणूक आयोगाने हे आक्षेप फेटाळल्यावर कॉंग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यामुळे दोन तास ही प्रक्रिया लांबली. केंद्रीय निवडणूक आयोगानेही कॉंग्रेसचा आक्षेप फेटाळल्यानंतर मतमोजणीला प्रारंभ झाला. मतमोजणी दरम्यान राष्ट्रवादी आणि भाजपाचे प्रत्येकी एक-एक मत बाद करण्यात आले. त्यामुळे विजयाचा कोटा 26 ठरविण्यात आला होता. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये शिवसेनेचे सचिन अहिर, आमशा पाडवी, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर, भाजपाचे प्रवीण दरेकर, उमा खापरे, प्रा. राम शिंदे, श्रीकांत भारतीय हे पहिल्या पसंतीची मते घेऊन विजयी झाले. तर कॉंग्रेसचे भाई जगताप, चंद्रकांत हांडोरे आणि भाजपाचे प्रसाद लाड यांच्यात अटीतटीची लढत झाली. त्यामध्ये पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटाही कॉंग्रेसचे उमेदवार पूर्ण करू न शकल्याने भाई जगताप हे 26 मते घेऊन विजयी झाले. तर भाजपाचे प्रसाद लाडही 26 मते मिळवत विजयी झाले. चंद्रकांत हांडोरे यांना मात्र 22 मते मिळाली. त्यामुळे कॉं्रगेसला मोठा धक्का बसला.
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाला 123 मते मिळाली होती. मात्र, या निवडणुकीत भाजपाला तब्बल 134 मते मिळाल्याने शिवसेनेची तीन आणि त्यांना पाठिंबा देणारे आठ अपक्षांची मते फुटल्याचे या निवडणुकीत स्पष्ट झाली.
भाजपाचा जल्लोष
भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाल्याने भाजपाने मोठा जल्लोष केला. हा विजय म्हणजे महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्‍वास यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला.

प्रवीण दरेकर-29
प्रा. राम शिंदे-30
उमा खापरे-27
श्रीकांत भारतीय-
प्रसाद लाड-28
एकनाथ खडसे -29
रामराजे नाईक निंबाळकर-28
सचिन अहिर-26
आमशा पाडवी -26
भाई जगताप -26

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *