मनोज जरांगे यांनी पुरावे द्यावेत : एकनाथ शिंदे
जालना/मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या पाचशे कोटींच्या आरोपावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया दिली आहे. पाचशे कोटींशी आपला काहीही संबंध नाही; जरांगेंनी तपास यंत्रणांना पुरावे द्यावेत, असे शिंदे म्हणाले. दरम्यान, जरांगे यांनी पुन्हा सांगितले की, या पाचशे कोटींच्या व्यवहाराच्या कुजबुजीत दोन माजी मुख्यमंत्र्यांसह मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. गुरुवारी (दि. 22) पुराव्यासह सर्व नावे उघड करणार आहे.
या सर्व घडामोडींवर मुंबईत पत्रकारांनी विचारले असता, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मी कोणालाही पाचशे कोटी दिलेही नाहीत आणि कोणाकडून घेतलेही नाहीत. देण्याचा प्रश्नच येत नाही. कोणत्याही आधारावर आरोप करण्याआधी त्याची शहानिशा करायला हवी. जरांगे पाटील ज्या माहितीच्या आधारे बोलत आहेत, त्याची त्यांनी आधी खातरजमा करायला हवी
होती.
एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना थेट आव्हानही दिले. जर त्यांच्याकडे काही पुरावे असतील, तर त्यांनी ते संबंधित तपास यंत्रणांकडे द्यावेत. त्याची चौकशी होऊन दूध का दूध, पानी का पानी होऊ द्या. सत्य समोर येईलच, असे शिंदे म्हणाले. आपल्या कामाच्या पद्धतीवर भाष्य करताना ते पुढे म्हणाले की, अनेकांना फक्त हेडलाइनमध्ये राहण्यासाठी माझे नाव घ्यावे लागते, हीच त्यांची पद्धत बनली आहे.
काय होता आरोप?
नारायणगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात जरांगे पाटील यांनी दावा केला होता की, भाजपच्या काही नेत्यांमध्ये अशी चर्चा आहे की, एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून भाजपकडून पाचशे कोटी रुपये घेतले आणि ते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला दिल्याचे सांगितले. ही रक्कम कुठे आहे, असा सवाल करत त्यांनी शिंदे यांनी खुलासा करावा, असे आव्हान दिले होते. तसेच यासंदर्भातील पुरावे गुरुवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत देणार असल्याचेही ते म्हणाले होते. या आरोपानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी जरांगे यांच्यावर जोरदार पलटवार केला होता.
It has nothing to do with five hundred crores.