नवरदेवाला पेटवून देण्याचा प्रयत्न
येवला : प्रतिनिधी
प्रेमविवाहाच्या रागातून येवल्यात भर लग्नमंडपात जोरदार राडा झाला. मुलीकडच्या मंडळींनी नवरदेवासह त्याच्या काही नातेवाइकांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
येवला शहरातील ऋषभ दीपक भगुंडे या तरुणाने निफाड तालुक्यातील रामपूर नैताळे येथील तरुणीशी सप्टेंबर महिन्यात पळून जाऊन कोर्ट मॅरेज (प्रेमविवाह) केले होते. या प्रेमविवाहाचा राग मुलीच्या नातेवाइकांच्या मनात होता. त्यानंतर 25 ऑक्टोबर 2026 रोजी येवल्यातील एका लॉन्सवर या जोडप्याचा पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. लग्नविधी सुरू असतानाच मुलीच्या बाजूचे नातेवाईक अचानक मंडपात आले आणि त्यांनी नवरदेव व त्याच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. संशयित हल्लेखोरांनी लग्न मंडपातच नवरदेव, त्याची आई आणि इतर नातेवाईकांच्या अंगावर डिझेल (ज्वलन्शील पदार्थ) ओतून त्यांना जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या तुंबळ हाणामारीत दोन्ही बाजूचे 7 ते 8 जण जखमी झाले आहेत. या संपूर्ण राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि मोबाईल कॅमेर्यात कैद झाला आहे. येवला शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी 10 ते 12 जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे
पोलिसांनी मुलगी आणि मुला कडील व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे लग्न मंडपात लहान मुले, महिला आणि उपस्थितांवर पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थाने हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप मुलाकडील व्यक्तींनी केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, येवला शहर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Uproar at a wedding venue in Yeola, fueled by anger over a love marriage