नाशिक : प्रतिनिधी
’पहिला दिवा लागेल दारी, सुखाचा किरण येईल घरी…’ असे म्हणत दिवाळी सणाचा पहिला दिवा गायवासराच्या पूजनाने घरोघरी लागणार आहे. वर्षातील सर्वांत मोठ्या सणाला आज (दि. 5) वसूबारस म्हणजेच गोवत्स द्वादशीला गोमातेच्या पूजनाने मंगलमय प्रारंभ होणार आहे.
भारतीय परंपरेतील सण म्हणजे दिवाळी. तिमिरातून तेजाकडे नेणारा सण दिवाळी. या सणाला विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील अमावस्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. या सणाचा शुभारंभ गोमातेचे पूजन करून होतो. आज, दि. 5 नोव्हेंबरला वसूबारस साजरी केली जाणार आहे.
शहर आणि ग्रामीण भागात गाय-वासराच्या पूजनासाठी घरोघरी तयारी करण्यात आली आहे. शहर व उपनगरातील गोशाळांतही जय्यत तयारी केली आहे. गोधनाप्रति आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसूबारस साजरी केली जाते.
वसूबारसनंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा व भाऊबीज या दिवाळीतील दिवसांंची सुरवात होते. ग्रामीण भागात शेतकरी गोठे स्वच्छ करून सजवले जातात. कुंकू, फुलेे वाहून दुधदुभत्या गायी-म्हशींना सजवतात. शहरी भागात जवळपासच्या गोठ्यात पूजनासाठी जातात किंवा गाय-वासराच्या मूर्तीचे, फोेटोचे पूजन केले जाते.सोशल मीडियावरही दिवाळीचे संदेश वसूबारसपासून सुरू करण्यात येतात. सोशल मीडियावर दिवाळी साजरी करण्याचा ट्रेंड असून, प्रत्येक आनंदाच्या क्षणांना कॅमेर्यात कैद केले जाते आणि व्हायरल करून आनंदात सहभागी करून घेतले जाते. त्यामुळे दिवाळीत आपल्या नातेवाईक, आप्तेष्टांना शुभेच्छा संदेशांची देवाणघेवाण करण्यास सुरवात होते.

असे आहेत पूजनाचे मुहूर्त
♠ वसूबारस (दि. 5 नोव्हेंबर, गुरुवार) प्रदोष काळ (गाय-वासरू पूजन) सायंकाळी 5.33 ते 7.57 पर्यंत. ♠ धनत्रयोदशी (दि. 6 नोव्हेंबर 2026, शुक्रवार) यमदीपदान मुहूर्त सायंकाळी 5.45 ते 7.20. ♠ नरक चतुर्दशी (दि. 8 नोव्हेंबर, रविवार) अभ्यंगस्नान मुहूर्त पहाटे 5.38 ते सकाळी 6.43. ♠ लक्ष्मीपूजन (दि. 8 नोव्हेंबर, रविवार) शुभ वेळ सायंकाळी 5.50 ते रात्री 10.50 पर्यंत. (प्रदोष काळ : संध्याकाळी 5.31 ते रात्री 8.09) ♠ दिवाळी पाडवा (दि. 10 नोव्हेंबर 2026, मंगळवार) ♠ बलिप्रतिपदा व गोवर्धन पूजा ♠ भाऊबीज (दि. 11 नोव्हेंबर) औक्षणाची वेळ : दुपारी व संध्याकाळी.
‘The Deepotsav begins with the worship of Mother Cow’