कोरोना काळातील फोनवरून आरोप-प्रत्यारोप
मुंबई : प्रतिनिधी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील पुतळा अनावरण कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोरोना काळातील कामकाजावरून केलेल्या टीकेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी तिखट प्रत्युत्तर दिले. ‘शहा हे चकाट्या पिटणारे गृहमंत्री आहेत. त्यांनी कोरोना काळात आपल्याला फोन केल्याचा दावा धादांत खोटा आहे,’ अशा शब्दांत ठाकरे यांनी शहा यांच्यावर हल्लाबोल केला. अजित पवारांवर हयातीत भ्रष्टाचाराचे आरोप करणार्या शहा यांनी त्यांच्या पुतळ्यासमोर नाक रगडून माफी मागायला हवी होती, असेही ते म्हणाले. या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिल्याने शहा-ठाकरे यांच्यातील वाद पुन्हा
उफाळला आहे.
पुण्यात सोमवारी झालेल्या कार्यक्रमात शहा यांनी नाव न घेता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. कोरोना काळात अजित पवार यांच्याशी रोज सकाळी सात वाजता संपर्क व्हायचा; मात्र तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी संपर्क होत नव्हता, ते फोनही उचलत नव्हते, असे शहा म्हणाले होते. त्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 14 व्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिले.
‘अमित शहा किती दिवसांनी अवतीर्ण झाले? दिल्लीत जेन-झी आंदोलन सुरू असताना ते कुठे होते? लोकसभेत उत्तर द्यायचे असताना सभागृहात येत नव्हते. असा हा चकाट्या पिटणारा गृहमंत्री आहे. त्यांनी चकाट्या पिटण्याशिवाय कारकिर्दीत दुसरे काही केले असे वाटत नाही,’ अशी टीका ठाकरे यांनी केली. कोरोना काळात शहा यांचा आपल्याला फोन आलाच नव्हता, असेही त्यांनी
स्पष्ट केले.
‘A Home Minister who just talks big’; Shah and Thackeray face off once again!