दारणा आवर्तनासाठी जिल्हाधिकार्‍यांचा ‘तुघलकी’ आदेश!

22 तास वीजबंदीचा 35 गावांना फटका; विहिरीतील पाणी उपसण्याचेही संकट

निफाड : तालुका प्रतिनिधी
दारणा धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी आवर्तन सोडण्याच्या नियोजनासाठी निफाड, सिन्नर आणि येवला तालुक्यांतील 35 गावांमध्ये दररोज तब्बल 22 तास वीजपुरवठा बंद ठेवण्याचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा आदेश म्हणजे शेतकर्‍यांना वेठीस धरणारा ‘मोहंमद तुघलकी’ निर्णय ठरत आहे.
सध्या उन्हाळ कांद्याच्या लागवडीचा हंगाम सुरू असताना शेतकर्‍यांना दिवसातील केवळ दोन तास वीज मिळणार असेल, तर कांदा लागवडीसाठी सिंचनाचे नियोजन कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे रब्बी हंगामातील शेतीकामांची लगबग सुरू असताना दुसरीकडे तब्बल 22 तास वीजबंदी लादल्याने शेतकर्‍यांचे शेतीचे वेळापत्रकच कोलमडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ज्या शेतकर्‍यांच्या स्वतःच्या विहिरींमध्ये पाणी उपलब्ध आहे, त्यांनाही या निर्णयामुळे सिंचन करता येणार नाही. कालव्याच्या आवर्तनाचे नियोजन करताना विहिरीतील पाण्याचा वापर करण्यासाठी आवश्यक असलेली वीजही बंद राहणार असल्याने स्वतःच्या विहिरीत पाणी असूनही शेतकर्‍यांना पिकांना पाणी देता येणार नाही. कालव्यावरील अनधिकृत पाणी उपसा रोखण्याच्या नावाखाली विहिरींच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांनाही वेठीस धरणे कितपत योग्य, असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार 18 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर 2026 या कालावधीत संबंधित गावांतील कालव्यालगतच्या रोहित्रांचा वीजपुरवठा दररोज सकाळी सहा ते आठ या दोन तासांव्यतिरिक्त बंद राहणार आहे. पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचविणे आणि अनधिकृत पाणी उपसा रोखणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना त्यासाठी थेट शेतकर्‍यांच्या वीजपुरवठ्यावर निर्बंध आणणे हा कोणता न्याय, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. पाणी व्यवस्थापनातील त्रुटींची शिक्षा शेतकर्‍यांना का, असा प्रश्नही या निर्णयामुळे ऐरणीवर आला आहे.

वीजबंदीचा आदेश लागू असलेली गावे
निफाड तालुका 19 गावे : म्हाळसाकोरे, तामसवाडी, ब्राह्मणवाडा, तारुखेडले, खानगाव, खेडलेझुंगे, कोळगाव, नांदूरमधमेश्वर, धारणगाव वीर, गाजरवाडी, धारणगाव खडक, कानळद, देवगाव, शिरवाडे, वाकद, धानोरे, नांदगाव, दहेगाव व रुई.
सिन्नर तालुका 12 गावे : चोंढी, मेंढी, सांगवी, सोमठाणे, दहिवाडी, कोळगाव माळ, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, शहापूर, वारेगाव, कोळगाव थडी व हंडेवाडी.
येवला तालुका 4 गावे : महालखेडा, निमगाव मढ, मुखेड व सत्यगाव.

District Collector’s ‘eccentric’ (Tughlaqi) order regarding Darna water rotation!

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *