प्रशासनाकडे तीस शेतकर्यांच्या हरकती
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राममधील 377 पैकी उर्वरित 191.21 एकर जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या काही दिवसांत साधुग्राममधील खातेधारकांसमवेत बैठक घेतली जाणार आहे. तत्पूर्वी प्रशासनाने शेतकर्यांच्या हरकती मागवल्या असता, एकूण तीस शेतकर्यांनी भूसंपादन प्रकरणी हरकती घेतल्या आहेत. आलेल्या हरकतींवर लवकरच प्रशासनाकडून सुनावणी घेऊन ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राममधील 191.21 एकर क्षेत्रासाठी राज्य शासनाने तब्बल दोन हजार 267 कोटींच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.
5 जून 2026 रोजी महाराष्ट्राच्या नगरविकास विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी करत 191.21 एकर जमीन कायमस्वरूपी संपादित करण्याचा मार्ग मोकळा केला. नाशिक विकास आराखड्यात साधुग्रामसाठी एकूण 377 एकर जागा आरक्षित होती. त्यापैकी 94 एकर जमीन यापूर्वीच प्रशासनाच्या ताब्यात आहे. उर्वरित 191.21 एकर खासगी जमिनीचे कायमस्वरूपी संपादन केले जाणार आहे. सदर मोबदल्याचे वाटप जिल्हास्तरीय समितीने कोणत्याही प्रशासकीय विलंबाशिवाय आरटीजीएस प्रणालीद्वारे थेट बाधित शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. दरम्यान, हा निधी एकरकमी स्वरूपात दिला जाणार असून, तो केवळ साधुग्राम जमीन संपादनासाठीच वापरणे बंधनकारक आहे. या निधीचा इतर कोणत्याही कामासाठी वापर केल्यास ती गंभीर आर्थिक अनियमितता मानली जाईल, असे शासनाने म्हटले होते. नाशिक महापालिकेकडून संबंधित 191.21 एकर जागेची मोजणी व कागदपत्रांची छाननी केली जात आहे. शासनाने निधी मंजूर केला असला तरी अद्याप भूसंपादनाचे दर निश्चित करता आलेले नाहीत. हे दर ठरल्यानंतर शेतकर्यांशी वाटाघाटी करून संपादनाची प्रत्यक्ष कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.
तेरा संस्थांकडे 60 एकर क्षेत्र
साधुग्राममधील 377 एकरपैकी 60 एकर क्षेत्र सामाजिक संस्थांकडे असून, मनपाकडे 54 एकर क्षेत्र यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. उर्वरित 192 एकर जमिनीसाठी शेतकर्यांची सुनावणी घेतली जाणार आहे.
वाटाघाटी समितीमधील सदस्य
अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली वाटाघाटी समितीची स्थापना केली आहे. सदर समितीत नगररचनेचे उपसंचालक, सहायक संचालक, मुख्य लेखा वित्त अधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, विधी विभागप्रमुख, शहर अभियंता, अधीक्षक अभियंता हे या समितीमधील सदस्य आहेत.
Moves towards land acquisition of 191 acres in Sadhugram