पाणी हेच जीवन आहे, हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. परंतु, आज हेच जीवन संकटात सापडले आहे. निसर्गाचा लहरीपणा, वाढती लोकसंख्या आणि पाण्याचा बेसुमार वापर यामुळे संपूर्ण जगासमोर तीव्र जलसंकटाची चाहूल लागली आहे. हे संकट केवळ सरकार किंवा प्रशासनाचे नसून, ते संपूर्ण मानवजातीचे आहे. त्यामुळे या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली सामूहिक जबाबदारी ओळखणे काळाची गरज बनली आहे.
महाराष्ट्र आणि देशाच्या अनेक भागांत यंदा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे धरणांतील साठा आणि विहिरींची भूजल पातळी झपाट्याने खाली गेली आहे. अल-निनोच्या प्रभावामुळे मान्सून कालावधीत (जून ते सप्टेंबर) अपेक्षित पाऊस पडला नाही. उदा. विदर्भातील वर्धा जिल्ह्यात सरासरी 874 मिमी पावसाच्या तुलनेत केवळ 558 मिमी पाऊस
झाला आहे.
अनेक भागांत पाऊस सलग न पडता मोठ्या खंडानंतर पडला. त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी राहिले आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाणीसाठा जमा झाला नाही. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातही तापमान जास्त राहिल्याने धरणे आणि नद्यांमधून पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतीच्या सिंचनासाठी विहिरी आणि बोअरवेलमधून मोठ्या प्रमाणात पाणी उपसले गेले. यामुळे भूजल सर्वेक्षण अहवालांनुसार राज्यातील शेकडो तालुक्यांतील विहिरींची पातळी 10 फुटांपेक्षा जास्त खाली गेली आहे. महाराष्ट्रातील भूजल साठ्याची आणि पाण्याची स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. अपुरा पाऊस आणि पाण्याचा बेसुमार उपसा यामुळे राज्यातील बहुतांश भागांत भूजल पातळी वेगाने खालावली असून, आगामी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आतापासूनच समाजातील सर्व घटकांनी मिळून पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करायला पाहिजे, पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
शेतीमध्ये पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पारंपरिक पद्धतींऐवजी ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन (स्प्रिंकलर) प्रणालीचा वापर करणे आवश्यक आहे. शेतकर्यांनी पारंपरिक सिंचनाऐवजी ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते. घरातील गळके नळ तातडीने दुरुस्त करणे, शॉवरऐवजी बादलीचा वापर करणे आणि वाहने पाइपने न धुता ओल्या कपड्याने पुसणे यांसारख्या सवयी अंगिकारणे गरजेचे आहे. घरांच्या आणि इमारतींच्या गच्चीवरील पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे किंवा साठवून ठेवणे, जेणेकरून भूजल पातळी वाढेल. गृहनिर्माण संस्थांनी आणि घरमालकांनी आपल्या छतावरील पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी यंत्रणा बसवणे गरजेचे आहे.स्वयंपाकघर किंवा वॉशबेसिनचे सांडपाणी साध्या प्रक्रियेतून शुद्ध करून बागकामासाठी किंवा इतर कामांसाठी वापरणे आवश्यक आहे. अंघोळ, कपडे धुणे आणि भांडी घासताना आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी वाया जाणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. पाणी ही केवळ सरकारची जबाबदारी नसून, ती प्रत्येक व्यक्तीची सामूहिक जबाबदारी आहे, ही जाणीव लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे, यासाठी गावात व शहरांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.पाण्याचे संवर्धन आणि योग्य वापर ही केवळ सरकारची नसून, प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. सरकार पाण्यासाठी धोरणे बनवते आणि पायाभूत सुविधा पुरवते, परंतु पाण्याचा प्रत्यक्ष वापर आणि बचत ही सामान्य लोकांच्या सवयींवरच अवलंबून असते.
धरणे, कालवे, जलशुद्धीकरण केंद्रे आणि नळपाणीपुरवठा योजना उभारणे हे सरकारचे मुख्य काम आहे. भूजल उपसा नियंत्रित करणे, औद्योगिक प्रदूषणावर बंदी घालणे आणि पाण्याच्या योग्य वाटपासाठी कडक नियम तयार करणे सरकारच्या अखत्यारीत येते. जलयुक्त शिवार किंवा नदीजोड प्रकल्पांसारख्या मोठ्या योजना राबवून पाण्याची पातळी वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करते. सरकारने कितीही मोठ्या योजना आणल्या तरी जोपर्यंत प्रत्येक नागरिक पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य मानून त्याचा जबाबदारीने वापर करत नाही, तोपर्यंत भविष्यातील पाणीटंचाईचे संकट टळणार नाही. म्हणूनच, शासन आणि समाज या दोघांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच शाश्वत जलव्यवस्थापन शक्य आहे.
थोडक्यात काय तर
पाणी कोणीही कारखान्यात तयार करू शकत नाही, ते आपल्याला निसर्गाकडून मिळालेले अमूल्य वरदान आहे.
निसर्गाने आपल्या गरजा भागवण्यासाठी पुरेसे पाणी दिले आहे, पण आपली हाव भागवण्यासाठी ते नक्कीच अपुरे आहे. आज आपण पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला तरच उद्याची पिढी सुरक्षित राहील. त्यामुळे केवळ दोषारोप न करता, प्रत्येकाने जलसंधारणाच्या या चळवळीत सक्रिय सहभाग घेणे हीच खरी काळाची गरज आहे.
Signs of a Water Crisis: An Awareness of Collective Responsibility