– अफजल पठाण
कधीकाळी ज्यांच्याशिवाय दिवस सरत नव्हता, आज त्यांच्याशी बोलण्यासाठीही वेळ मागावा लागतो. एक काळ असा असतो, जेव्हा आपल्या आयुष्यात काही माणसं इतकी जवळची असतात की, त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. सुख असो वा दुःख, आनंद असो वा संकट, प्रत्येक क्षणी त्यांची साथ आपल्याला हवी असते. त्यांच्या एका फोनने चेहर्यावर हसू उमलतं, त्यांच्या दोन शब्दांनी मनाला आधार मिळतो आणि त्यांच्या सहवासात आयुष्यातील कितीही मोठं दुःख हलकं वाटतं. पण काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि कधीकधी याच माणसांच्या वागण्यातही इतका बदल होतो की, एक दिवस आपण स्वतःलाच प्रश्न विचारतो, ही तीच माणसं आहेत का, ज्यांच्यासाठी कधीकाळी आपण स्वतःला विसरून गेलो होतो? ज्या माणसांसाठी आपण आपला वेळ दिला, स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवल्या, त्यांच्या आनंदात आपला आनंद शोधला, त्यांच्या दुःखात त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलो, तीच माणसं जेव्हा आपल्याकडे पाठ फिरवतात, तेव्हा मनाला होणार्या वेदना शब्दांत सांगता येत नाहीत. परक्यांनी दिलेल्या जखमा कधीतरी भरून येतात; पण आपल्या माणसांनी दिलेल्या जखमा मनाच्या खोल कोपर्यात कायमच्या घर करून बसतात. कारण परक्यांकडून अपेक्षा नसते, पण आपल्या माणसांकडून असते.
आजच्या काळात नाती जपण्यापेक्षा नाती दाखवण्याला अधिक महत्त्व मिळू लागलं आहे. मोबाइलमध्ये शेकडो नंबर असतात, सोशल मीडियावर हजारो मित्र असतात, वाढदिवसाला शुभेच्छांचा वर्षाव होतो, पण मन खचलेलं असताना, डोळ्यांत अश्रू असताना आणि कुणाच्या तरी आधाराची गरज असताना फोन करण्यासाठी एकही माणूस सापडत नाही, ही आजच्या नात्यांची खरी शोकांतिका आहे. काही माणसं आपल्या आयुष्यात असतात, पण आपल्या मनात नसतात; तर काही माणसं मनात कायम असतात, पण आयुष्यातून कधीच निघून गेलेली असतात सगळ्यात जास्त दुःख तेव्हा होतं, जेव्हा आपण एखाद्याला आपलं समजून मनातील प्रत्येक गोष्ट सांगितलेली असते आणि एक दिवस तीच व्यक्ती आपल्यासाठी अनोळखी बनते. पूर्वी तासन्तास चालणारे संवाद आता दोन शब्दांवर येऊन थांबतात. कधीही न बोलावता घरी येणारी माणसं आता भेटण्यासाठी वेळ मागायला लावतात. आपली काळजी करणारे आज आपली विचारपूसही करत नाहीत. आणि आपण मात्र जुन्या आठवणींच्या आधारावर आजही त्या नात्याला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.
कधीकधी मनाला एवढंच वाटतं की, एकदा तरी कुणीतरी विचारावं, काय रे, खरंच ठीक आहेस ना? चेहर्यावर हसू आहे म्हणून माणूस आनंदी असतोच असं नाही. अनेक माणसं गर्दीत हसत असतात, पण एकांतात मात्र अश्रूंना वाट मोकळी करून देत असतात. कुणाला आपलं दुःख सांगावं, कुणासमोर मन मोकळं करावं, हा प्रश्न त्यांना सतावत असतो. कारण ज्यांच्यासमोर कधी मन मोकळं केलं, त्यांनीच कधीतरी त्या भावनांची किंमत केली नसत आयुष्याच्या प्रवासात एक गोष्ट मात्र हळूहळू समजते, प्रत्येक जवळचं माणूस आपलं असतंच असं नाही आणि प्रत्येक दूर गेलेलं माणूस विसरलं जातंच असंही नाही. काही माणसं शरीराने दूर जातात, पण आठवणींमध्ये कायम राहतात. तर काही माणसं रोज समोर असतात, पण मनाने इतकी दूर गेलेली असतात की त्यांच्याशी बोलतानाही परकेपणा जाणवतो. माणसाला महागड्या भेटवस्तूंची, मोठ्या आश्वासनांची किंवा सततच्या कौतुकाची गरज नसते. कधी तरी केलेली मनापासून विचारपूस, अडचणीच्या वेळी दिलेला आधार,
दुःखाच्या क्षणी पाठीवर ठेवलेला हात आणि न बोलताही भावना समजून घेणारी व्यक्ती एवढंच पुरेसं असतं. कारण नाती पैशाने मोठी होत नाहीत, ती वेळ देऊन, विश्वास ठेवून आणि एकमेकांच्या भावना जपून मोठी होतात.
आज आपण प्रत्येक गोष्टीसाठी वेळ काढतो, पण आपल्या माणसांसाठी वेळ काढायला विसरतो आहोत. पैसा कमावता येतो, प्रतिष्ठा मिळवता येते, नवी माणसं जोडता येतात, पण एकदा मनातून उतरलेलं नातं पुन्हा पूर्वीसारखं होईलच याची खात्री नसते. म्हणून नाती तुटल्यानंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा ती जिवंत असतानाच जपायला शिका. कारण माणूस निघून गेल्यानंतर त्याचा फोटो पाहून अश्रू ढाळण्यात अर्थ नसतो; तो जिवंत असताना त्याच्या चेहर्यावर हसू आणता आलं पाहिजे. जवळ असताना ज्यांची किंमत कळत नाही, दूर गेल्यावर त्यांच्याच आठवणी रडवतात नाती तोडायला एका क्षणाचा राग पुरतो, पण तीच नाती पुन्हा जोडायला कधी कधी संपूर्ण आयुष्य अपुरं पडतं , म्हणून कुणाच्या आयुष्यात इतकेही परके होऊ नका की, एक दिवस त्या व्यक्तीला तुमच्याशी बोलण्याची इच्छा असूनही बोलता येऊ नये. कारण जगात सर्वांत मोठं दुःख म्हणजे आपल्या माणसांची गर्दी असूनही मनाने एकटं पडणं. आणि सर्वांत मोठी शोकांतिका म्हणजे ज्या माणसांसाठी आपण संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं, त्यांच्याच आयुष्यात एक दिवस आपण अनोळखी होऊन जाणं!
People who have become strangers!