एक होती सुखद वनराई

– सुजाता येवले
फळबियांच्या शोधात वृक्षावृक्षांत धावत होती, डोळ्यात आसवे आणत होती. दुरवर गेलेल्या सहचरांना आठवत होती. मेलेल्यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून डोहाजवळ जाऊन प्रार्थना करत होती. खंगलेल्या, दुखावलेल्यांसाठी झाडपाला औषधे शोधत होती. नंतर दुर्गंधी सहन न होऊन अशक्तपणे झाडावर चढत होती. तिचे सरसरणे अडले, ताल बिघडला, लय बिघडली, डौल कमजोर झाला, शेपटीचा झुपका अशक्त झाला. ती आला दिवस ढकलत होती.
एके दिवशी शहरास भेट देण्यासाठी साधुसंतांचा जत्था येणार याचे शहरात सुतोवाच झाले. तसा तर तो दर बारा वर्षांनी येतच होता. ’साधूसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा’ म्हणून म्होरक्या, जथ्यांसह सर्वच शहरवासी सज्ज झाले. जथे नटूनथटून तर शहरवासी नम्रतेने झुकून संतांच्या येण्याची वाट बघत होते.
शहरवासी यांना ही गोष्ट नवीन नव्हती. शहरवासीयांपेक्षा आपण साधूंचे स्वागत चांगले करू म्हणून जथ्याने नेतृत्व हाती घेतले. अखंड सूचनांचा स्रोत तो बनला. म्होरक्याने रस्ते खोदले. रस्त्यांसाठी अनेक बापवृक्षांचे, कल्पवृक्षांचे, इतर झाडांचे मूळं तोडले. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते शहराची दशा दशा झाली. म्होरक्याची टोळीने नशेत दशेला दृष्टिआड केले. खड्ड्यात माणसे पडली, काही दवाखान्यात गेली, काही स्मशानात गेली. गाड्या अडल्या, पण काम की कामाचा देखावा चालूच. दिवस गेले, महिने गेले, खड्डे बुजवले जात नव्हते. शहरवासी मनाला खात होते. सदाचार संपत नव्हता. जथ्यांचा ओघ थांबतच नव्हता. शहर घरांनी शिगोशिग भरले. शहर वेशीबाहेर उतु गेले. कवेत मावणार नाही इतके वाढले. कव तोकडी पडली. हातापायातील शक्ती गेली. आता साधू-संतांनी राहायचे कुठे?
म्होरक्या फेरफटका मारण्यास निघाला. रस्ते दचकले, झाडे भेदरली, मलूल झाली, परत कसले परचक्र म्हणून घाबरू लागली. खारुताई काट्याकुट्यात लपली. मोरक्याची तीक्ष्ण, हपापलेली नजर वनराईवर रोखली. झाडे लटलट कापू लागली. उसने अवसान आणू लागली. धरणे धरू लागली. मोर्चे काढू लागली. सभा-संमेलनांची रीघ लागली. निदर्शने झाली, प्रदर्शने झाली, पोलिसांनी आधी काठ्या उगारल्या मग खाली टाकल्या. म्होरक्यापुढे हतबल म्हणून उसासे टाकू लागल्या. कविता झाल्या, धडे झाले, एकामागून एक प्रकरणे झाली, पण म्होरक्याचे मन नाही द्रवले. देव सुद्धा गलबलले. म्हणाले आता नाही पाडत पाऊस, वृक्षतोडीची तुला हौस, शहर विद्रूपीकरणामागे नको लागूस. अरे इतकी झाडे कापली, तुला लाज नाही वाटली. वनराई तर शहराची शान. शुद्ध हवा, प्राणवायुची खाण. झाडे तोडशील तर देईन तडाखा. विसर आता तुझा आडाखा.
म्होरक्याने नाही ऐकले. त्याला जे करायचे तेच केले. नाही वृक्ष, नाही लता, नाही वेली, खारूताई ही कुणास ठाऊक कुठे गेली? शहराची शान गेली, पावित्र्याची खाण गेली. प्राणवायूच्या कोठाराची व्याख्याच बदलली. शहरवासी आता उसासा टाकतात. जथ्याला दिलेल्या भाकरी आठवतात. पुढे असलेल्या ताटातल्या शिळ्या वातड चावतात. स्वतःच्या मोडकळीस आलेल्या वाड्याकडे बघत शून्यात नजर लावतात.
एकदा दुसर्‍या शहरातून आंब्यांचा वानोळा आला. म्होरक्याने खणलेल्या खड्ड्यावरून उधळला. काही आंब्यांचा सडाच पडला. निस्तेज खारूताई खोल खड्ड्यात लपली होती. रस्त्यापेक्षा खड्ड्यात सुरक्षित म्हणू लागली होती. थोड्या थोड्या वेळात खड्ड्यातून वर येऊन उरला सुरला प्राणवायू छातीत भरून घेत होती. कुठेतरी कुजलेली फळे, बिया शोधून खात होती. रस्त्याकडेच्या खड्ड्यात लपत होती. आज तर आंब्यांचा खजिनाच गवसला. खूप दिवसांनी तिचा डोळा हसला. आंबा ओढत खड्ड्यात बसली. सहचरांना हाक मारत आनंदात मुसमुसली. सर्वच खड्डे आंब्यांनी भरले. सहचरांनी त्यावर ताव मारले. रस गेला पोटात, गाणी आली ओठात. तृप्त सहचर दूर उडाले. आंब्याच्या बीजाचे पाय जडावले. पावसाच्या देवाने नेत्र उघडले. अमृताचे थेंब बीज आणि मातीवर पडले. माती गर्भार, बीजांकुरांचा जमिनीवर थरार. साधू-संतांचा घोळका मार्गस्थ झाला. शहराकडे वाट चालू लागला. बीजांकुरांना जणू वरदहस्त लाभला. साधूंनी कमांडलूतले जलामृत शिंपडले. बीजांकुरांच्या मस्तकावर पडले. सर सर सर सर वर झेपावले. अंकुरांचे वृक्ष झाले. मातीवर हिरवे गोंदण ल्याले. पाने फुले फळे हसू लागले, खेळू लागले, साधुसंत प्रसन्न जाहले. खारूताईने आनंदाने साद घातली. सहचरांची तिथे वस्ती जमली. चिमण्या, कावळे, राघू, मैना, साळुंकी, कबुतर, पारवा नि भारद्वाज, वाजवू लागले टाळ-चिपळ्या नि पखवाज. शहराची वस्ती दूर राहिली. साधू-संतांची मांदियाळी शहराबाहेरच रमली. शहरात आता एकला म्होरक्या; त्याचे आता कोणी ऐकत नाही बरं का! जथ्यांनी आता हातपाय पसरले. भाकरी पैशाच्या सुखात लोळले, शहरवासीयांचे जीवन चांगलेच आक्रसले. अश्रूभरल्या डोळ्यांनी कोरडा डोह बघतो सिमेंट काँक्रीट मशिनची नवलाई अन् कण्हत कुढत म्हणतो ’एक होती सुखद वनराई’.
(समाप्त)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *