शायना एनसींच्या कृतीवर ठाकरे गट, काँग्रेसचा संताप; भाजपकडूनही माफीची मागणी, शिंदेंकडून मात्र पाठराखण!
मुंबई : प्रतिनिधी
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कथित अवमानाविरोधात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडल्याच्या आरोपावरून बुधवारी (दि. 18) राज्याच्या राजकारणात वादंग निर्माण झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांच्या कृतीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. विशेष म्हणजे, महायुतीतील मित्रपक्ष भाजपनेही या प्रकाराबद्दल शायना यांनी माफी मागावी, अशी भूमिका घेतली. मात्र, बाळासाहेबांचा नव्हे, तर काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचाच फोटो फाडल्याचा दावा शायना यांनी केला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांची पाठराखण केली आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक उल्लेख असल्याचा आरोप शिंदे यांच्या शिवसेनेने केला आहे. पुस्तकातील आक्षेपार्ह मजकूर हटवावा आणि त्याच्या वितरणावर बंदी घालावी, अशी मागणी करत शायना एनसी, संजय निरुपम आणि आनंद दुबे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुस्तकाची पाने आणि काही छायाचित्रे फाडून निषेध नोंदवण्यात आला.
या छायाचित्रांमध्ये 2004 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला जोडे मारून केलेल्या आंदोलनाचे छायाचित्रही होते. शायना यांनी ते छायाचित्र फाडण्यास सुरुवात केली. त्यात बाळासाहेबांचीही प्रतिमा असल्याचे लक्षात येताच संजय निरुपम यांनी त्यांना सावध केले. या प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मूळ आंदोलनाचा विषय मागे पडून बाळासाहेबांच्या कथित अवमानावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी हा प्रकार महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि लाखो शिवसैनिकांच्या भावनांचा अवमान असल्याची टीका केली. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही शिंदे गटावर निशाणा साधत बाळासाहेबांच्या नावाचा राजकीय वापर केला जात असल्याचा आरोप केला.
भाजपकडूनही माफी मागण्याचा सल्ला
या वादात भाजपनेही शायना एनसी यांच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी हा प्रकार दुर्दैवी असल्याचे सांगत शायना एनसी आणि संबंधित पदाधिकार्यांनी माफी मागावी, अशी भूमिका मांडली. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शायना एनसी यांची पाठराखण केली असताना, दुसरीकडे मित्रपक्ष भाजपने माफीची मागणी केल्याने या वादात महायुतीतील दोन पक्षांच्या भूमिकांमधील मतभिन्नताही समोर आली आहे.
शिंदेंकडून शायनांची पाठराखण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शायना एनसी यांची पाठराखण केली. बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत असून कोणताही शिवसैनिक त्यांचा अपमान करू शकत नाही. शायना यांनी फाडलेले छायाचित्र आपल्याला दाखवले असून त्यामध्ये मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेचा भाग फाडण्यात आला आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
‘बाळासाहेब नव्हे, अय्यर यांचा फोटो फाडला’ : शायना
वाद वाढल्यानंतर शायना एनसी यांनी आरोप फेटाळून लावले. बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत असून, त्यांचा अवमान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपण मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेचा भाग फाडला, बाळासाहेबांचा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अय्यर यांचा फोटो हजार वेळा फाडण्याची तयारी असल्याचेही त्या म्हणाल्या.
ठाकरे गटाचा संताप; काँग्रेसचीही टीका
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला. बाळासाहेबांचा अपमान करणार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही बाळासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नसल्याचे सांगत शिंदे गटाच्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित केला. ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी मुंबई महापालिकेत आंदोलन करून शायना यांच्या हकालपट्टीची मागणी केली.
Political uproar over Balasaheb’s photograph