कसबे वणी-नाशिक रस्त्यावर अपघातात एक ठार, सहा जखमी

ओझरखेड धरणाजवळ थार-अर्टिगाची धडक

दिंडोरी : प्रतिनिधी
कसबे वणी- नाशिक रस्त्यावर ओझरखेड धरणाच्या सांडव्यापुढील हॉटेल श्रीहरीजवळ मंगळवारी (दि. 17) रात्री साडेदहाच्या सुमारास थार आणि अर्टिगा मोटारीची समोरासमोर भीषण धडक झाली. या दुर्घटनेत अर्टिगा चालक सुनील अरुण शिंदे यांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, थार (एमएच 15 जेएच 8882) नाशिकच्या दिशेने, तर अर्टिगा (एमएच 15 केयू 1205) वणीच्या दिशेने जात होती. दोन्ही वाहनांची धडक इतकी जोरदार होती की, त्यांच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि जखमींना उपचारासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत फड व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला आणि वाहतूक सुरळीत केली.
या अपघातात अजय पाटील, दिनेश पाटील, काजल पाटील, भावेश पाटील, शिवसागर शिंदे आणि यश पाटील हे सहा जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण वरखेडा येथील रहिवासी असून, अर्टिगा मोटारीतून प्रवास करत होते. दरम्यान, थार गाडीत नेमके किती प्रवासी होते आणि जखमींना पुढील उपचारासाठी कोणत्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे, याबाबतची अधिक माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

One killed, six injured in an accident on the Kasbe Vani-Nashik road

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *