मुंबईला पाणीपुरवठा करणारे वैतरणा धरण ‘ओव्हरफ्लो’

वैतरणानगर : वार्ताहर

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वांत महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. काल सांडव्याचे एक फूट गेट उचलत 610 क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला असून कालव्याद्वारे 400 क्यूसेकने विसर्ग करण्यात आला आहे. धरण भरल्याने मुंबईकरांसह वैतरणा परिसरातील नागरिक व शेतकर्‍यांची चिंता मिटली आहे.
जुलै महिन्यात धरणक्षेत्रात मुसळधार पावसासह संततधार सुरू असल्याने काल अखेर अप्पर वैतरणा धरण दुपारी दोन वाजता ओव्हरफ्लो झाले. 89 टक्के भरल्याने सांडव्याद्वारे 610 क्यूसेकने तर कालव्याद्वारे 400 क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. धरणामध्ये पाण्याची आवक सुरूच आहे. धरणक्षेत्रात पाण्याची आवक वाढल्यास सांडव्याद्वारे आणखी विसर्ग वाढवण्यात येऊ शकतो असा अंदाज असून, त्या दृष्टीने वैतरणा पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता नीलेश वन्नेरे, शाखा अभियंता योगेश निकुंबे आदींसह कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
अप्पर वैतरणा धरण परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतो. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात परिसराकडे पाठ फिरवली होती. मात्र, अप्पर वैतरणा यावर्षी पर्यटकांची वर्दळीने गजबजून गेले आहे. वैतरणा धरण सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आहे. डोंगरदर्‍यांवरून कोसळणारे पाणी मोठ्या प्रमाणात असून, छोटे – मोठे अनेक धबधबे बघायला मिळतात. परिसरात धबधब्यांसह धुके व संपूर्ण परिसर हिरवामय झाल्याने या परिसराचे आकर्षण कायम असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *