खड्ड्यातून दुचाकी उडाली, थेट बसखाली घुसली

पंचवटी : सुनील बुणगे

शहरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने शहर आणि परिसरातील सर्वच ठिकाणच्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. अशाच प्रकारे पेठरोडवरील सप्तरंग सोसायटीच्या खड्ड्यातून दुचाकी उडून थेट एसटी महामंडळाच्या गाडीखाली घुसली; मात्र चालकाने गाडी सोडून दिल्याने चालक मात्र दैव बलवत्तर म्हणून बालंबाल बचावला.
रविवार दि. 24 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पेठरोडवरून भूषण पवार, विजयनगर सिडको, हा इलेक्ट्रिशियन आपल्या सहकार्‍यांसह दुचाकीने (एमएच 48 एजे 7542) पेठरोडकडे जात असताना सप्तरंग सोसायटीसमोर एका खड्ड्यात आदळला. याचवेळी रस्त्यावरून पेठरोडवरून महामंडळाची बस (एम डब्ल्यूक्यू 380) बंद असलेल्या बसला (एमएच 06 एस 8636) टोचन करून पेठरोडवरील एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये घेऊन जात असताना भूषण पवार याने गाडी खड्ड्यात आदळल्याने ती सोडून दिली. समोरून टोचन असलेल्या गाडीतील चालकाने देखील लागलीच ब्रेक दाबल्याने दुचाकी थेट गाडीच्या चाकाखाली अडकून बसली होती.
एसटीचालकाने ब्रेक दाबल्याने गाडीला टोचन केलेला रॉड देखील तुटून गेला. मात्र, वेळीच दुचाकीचालकाने दुचाकी सोडून दिल्याने तो दैव बलवत्तर म्हणून तो वाचला. जर त्याने गाडी सोडली नसती आणि एसटीचालकाने ब्रेक दाबला नसता तर मोठा अनर्थ घडला असता, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
पावसामुळे शहरात सर्वत्र खड्डेच खड्डे पडले असून, शनिवार दि. 23 पेठरोडवर शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड समोर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने लांबउडी आंदोलन करण्यात आले होते. पेठरोडवरील पाटापासून ते मनपा हद्दीपर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी तर रस्त्याची अगदी चाळण झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच आरटीओ, शरदचंद्र पवार मार्केट यार्ड, सिग्नलवरील चौफुली, एसटी महामंडळाची विभागीय कार्यशाळा परिसर या परिसरात तर वाहन चालवताना वाहनचालकांची मोठी कसरत होत आहे. त्यातच पाऊस देखील उघडायचे नाव घेत नसल्याने रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचत असल्याने खड्डे समजत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *