त्र्यंबक तालुक्यातील देवगाव आश्रमशाळेतील गंभीर प्रकार
नाशिक : प्रतिनिधी
मासिक पाळी आलेल्या एका विद्यार्थिनीला वृक्षारोपण करू नको, असे एका शिक्षकानेे सांगितले. य विद्यार्थिनीला वृक्षारोपणापासून रोखल्याच्या या घटनेमुळे समाजातील विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. ही घटना त्र्यबंकेश्वर तालुक्यातील देवगाव आश्रम शाळेत घडली. मात्र, शिक्षण विस्तार अधिकार्यांनी असा प्रकार घडला नसल्याचे म्हटले आहे. तर राज्य महिला आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
शासकीय कन्या आश्रम शाळेत पावसाळा असल्याने आश्रमाच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र एका विद्यार्थिंनीला शिक्षकांनी वृक्षरोपण करण्यापासून थांबवले. तसेच तुझी पाळी सुरू आहे, तू झाड लावलेस, तर ते झाड मरेल असे सांगून विदयार्थिंनीला वृक्षारोपण करू दिले नाही. या प्रकारानंतर विद्यार्थिंनीने शाळेत घडलेला प्रकार पालकांना सांगितला. यानंतर पीडित मुलीनेे आदिवासी विकास विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनंतर संबंधीत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश अप्पर आयुक्तांनी दिले आहेत.
दुसर्या बाजूला या प्रकरणाची शिक्षण विस्तार अधिकार्यांनी चौकशी करत दिलेल्या अहवालात असा प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रकल्पधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी वर्षा मिना या स्वत: संबंधित मुलींशी आज (दि.27) भेटून चर्चा करणार आहेत.
या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी घेतली आहे. तसेच संबंधित विभागाने प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी असे नमूद केले.