मांसाहाराचे वाढले भाव; खवय्यांचा मात्र मटणावर ताव
नाशिक ः देवयानी सोनार
दीप अमावास्या अर्थात गटारी आज गुरुवारी साजरी होत आहे. श्रावण मासारंभ होत असल्याने अनेकजण श्रावण महिनाभर किंवा चातुर्मास असल्याने मांसाहार करणे टाळतात. त्यामुळे दीप अमावास्या आषाढाच्या शेवटच्या दिवशी मांसाहार करीत गटारी साजरी करण्यास पसंती दिली जाते. गटारी, दीप अमावास्या गुरुवारी आल्याने अनेकांनी एक दिवस आधीच गटारी साजरी केली.
दरवाढ आणि हॉटेलमध्येही मागणी असल्याने दरवाढ होऊनही खवय्यांनी गटारीला मटणावर ताव मारला. दोन दिवस आधीपासूनच गटारीसाठी विक्रेत्यांनीही दरवाढ कायम ठेवली.इंधनदरवाढ, पावसामुळे आवकेवर परिणाम झाल्यानेही दरवाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. अनेकजण वार पाळत असल्याने सोमवार, गुरुवार, शनिवार असे दिवस टाळून मांसाहार करतात. त्यामुळे अनेकांनी घरी, हॉटेलमध्ये मांसाहार करण्यास पसंती दिली.शहर आणि उपनगरांतील हॉटेल्स आणि मटण बाजारात चांगलीच गर्दी दिसून आली.त्याचबरोबर मांसाहारी पदार्थ बनविण्यासाठी मसाले, रेडिमेड ग्रेव्ही किंवा पार्सललाही मागणी असल्याचे विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.
मटण, चिकन, मासे या मांसाहारी पदार्थांना चांगलीच मागणी असल्याने दर वधारलेले राहिले. कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मांसाहारावर भर देण्यात आला होता. त्यामुळे मांसाहारी पदार्थांना मागणी कायम होती. कोरोना उतरणीनंतर जनजीवन पूर्वपदावर आले आहे.
गटारीला चिकन, मटण, मासे यांना जास्त मागणी असते. त्यामानाने अंड्यांना कमी मागणी आहे. पुढे चातुर्मास असल्याने अंडी व्यवसायावर परिणाम होतो. बरेचसे नागरिक या काळात मांंसाहार करणे टाळतात. गेल्या वर्षी मात्र कोरोना काळाच्या दरम्यान प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अंडी फायदेशीर असल्याने चांगला प्रतिसाद मिळाला होता.
-अलका बोरसे
(अंडी विक्रेत्या)