नागरिकांची पाठ: पंधरा दिवसांत 28 टक्के जणांचा प्रतिसाद
नाशिक ः देवयानी सोनार
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने 15 जुलैपासून पुढील 75 दिवस मोफत बुस्टर डोस देण्यास सुरूवात करण्यात आली. गेल्या पंधरा दिवसांत अवघ्या 28 टक्के नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे.शहरातील काही भाग सोडल्यास तसेच आदिवासी भागात कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. कोरोना उतरणीनंतर लसीकरणाकडेही कानाडोळा करण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्येष्ठ,शिक्षित व्यक्तीही डोस घेण्यास अनुत्सुक असल्याचे चित्र आहे. नाशिक ग्रामीणमध्ये 79 हजार 290 जणांनी बुस्टर डोस घेतला. पालिका क्षेत्रात 28 हजार 745 जणांनी तर मालेगाव क्षेत्रात 2312 आणि संपूर्ण जिल्ह्यात 1लाख 10 हजार 347 जणांनी बुस्टर डोस घेतला आहे. आदिवासी भाग आणि मालेगाव क्षेत्रात बुस्टर डोसकडे नागरिकांनी पाठ फिरविली आहे.गेल्या आठवड्यातील पावसामुळे लसीकरणावर परिणाम झाला आहे.
शहरातील लसीकरण केंद्रावर कोवीशिल्ड,को व्हॅक्सिन,काबोव्हॅक्स् लसीचे डोस उपलब्ध करण्यात आलेले आहेत. त्यानुसार लसीचा पहिला डोस घेण्यार्यांचे 93.45 टक्के प्रमाण आहे.दुसर्या डोसचे 75.20 टक्के तर बुस्टर डोसचे केवळ 7.32 टक्केच लसीकरण झाले आहे. 12 ते 14 ,15 ते 17 ,45 ते 60 आणि 60 वर्षापुढील नागरिक अशा वयोगटाने लसीचा पहिला,दुसरा आणि बुस्टर डोस घेतले आहेत.आतापर्यंत एकूण 3 लाख 20 हजार 985 जणांनी बुस्टर डोस घेतला आहे.
अठरा ते साठ वयोगटातील बुस्टर डोस मोफत देण्याचे निर्णयाने पुढील 75 दिवसांपर्यंत 18 वर्षांवरील नागरिकांना कोविड लसीचा बूस्टर डोस डोस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात शुक्रवार (दि.15) अठरा वयोगटापासून पुढील नागरिकांनी पहिल्याच दिवशी सात हजार बुस्टर डोस घेतला होता. कोरोना लढाईसाठी लसीकरण वेगाने आणि प्रत्येक नागरिकाचे व्हावे यासाठी शासनाने विविध हर घर दस्तक,अठरा ते साठ वयोगटातील बुस्टर डोस मोफत अशा योजना सुरू करून कोरोना प्रतिबंधात्मक लढाईसाठी सज्ज राहण्यासाठीचे पाऊल उचलले आहे.
कोण घेऊ शकतो बुस्टर डोस?
नाशिक महानगपालिकेच्या जवळच्या लसीकरण केंद्रावर बूस्टर डोससाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करु शकतात.ज्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे आणि त्यांना दुसरा डोस घेऊन सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल त्या व्यक्ती बूस्टर डोस घेऊ शकतात.
येथे मिळतो बुस्टर डोस!
नाशिक महानगरपालिकेच्या शहरातील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयात बूस्टर डोस मिळेल. पालिकेचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय व हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे(नवीन बिटको) रुग्णालय येथे 24 तास लसीकरण केंद्र सुरू राहणार आहे.