1 ते 7 ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह
नाशिक : देवयानी सोनार
‘बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे झाले आई’ या सार्थ ओळी आई आणि मुलाच्या नात्यातील संबंध दृढ करतात. प्रसूतीनंतर आईला येणारे पहिले दूध हे बाळासाठी संजीवनी देणारे, लसीकरणासारखे काम करते. बाळाला विविध आजारांपासून दूर ठेवते. परंतु बदलती जीवनशैली किंवा शारीरिक काही कारणांमुळे आई बाळाला दूध पाजू शकत नाही. त्यावेळी इतर पर्याय वापरले जातात. परंतु ते सर्वांनाच शक्य होईल असे नसल्याने मिल्क बँकसारखे उपक्रम ङ्गायदेशीर ठरत आहेत.
नुकतेच जिल्हा रुग्णालयात सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने मिल्क बँक सुरू करण्यात आली आहे.
आईचे दूध नवजात बालकांना जीवनदायी असतेच; शिवाय जीवनदायी पोषक तत्त्वे प्रदान करते हे सांगायला नकोच. जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केली आहे की, बाळाच्या जन्मापासून ते सहा महिने वयापर्यंत केवळ आईचेच दूध बाळास पाजावे.
पण काही वेळा अशी परिस्थिती असते जेव्हा अर्भक हे अमृत देणार्या जीवनापासून अर्थात दुधापासून वंचित असते.
जसे, बाळाच्या जन्मावेळी मातेचा मृत्यू होतो. अपूर्ण दिवसांची बालके किंवा काही गुंतागुंतीमुळे आईचे दूध अपुरे मिळते आणि अशी अनेक कारणे असू शकतात. अशा सर्व उदाहरणांमध्ये एकमेव उपाय म्हणजे इतर मातेचे पाश्चराईज केलेले दूध अर्भकाला उपलब्ध करून देणे. सर्वांनाच असे करणे शक्य होत नाही, त्यामुळे तंत्रज्ञाचा आधार घेत सर्वसाधारणपणे, प्रत्येक आईला देवाने अतिरिक्त दुधाची भेट दिली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे दूध काढणे, त्याची चाचणी घेणे आणि नंतर ते कुपोषित किंवा गरजू अर्भकाला देणे शक्य होते. ह्युमन मिल्क बँक हेच कार्य करते. हे दूध दान करण्यास इच्छुक असलेल्या स्तनदा मातांना एकत्र आणते, ते शास्त्रोक्त पद्धतीने साठवते आणि नंतर ज्यांना त्याची नितांत गरज आहे अशा बालकांना ते
देते.
आईचे दूध बाळासाठी अमृत मानले गेले आहे हे संशोधनाने सिद्ध झाले आहे.स्तनपानाविषयक मातांसाठी जनजागृती करण्यात येते. यासाठी एक ते सात ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. एक स्त्री जेव्हा माता बनते तेव्हा तिला पूर्णत्वाची अनुभूती येत असते असे म्हटले जाते. आईच्या स्तनपानाने आई आणि बाळाचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात. बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आईचे दूध हे सर्वोत्तम मानले गेले आहे. सुरुवातीचे सहा महिनेे केवळ आईचे दूध हाच एकमेव बाळाचा आहार मानला गेला आहे. आईचे दूध म्हणजे बाळाचे पहिले लसीकरण. दरवर्षी जगभरात स्तनपान दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने संागितल्याप्रमाणे आईचे पिवळे दूध ज्याला चिक किंवा कोलेस्ट्रॉम म्हणतात. हे नवजात शिशूसाठी अतिशय पोषक आहे. ते रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचे कार्य करते. त्यासाठी बाळ जन्माला आल्यानंतर नवजात शिशूला आईचे दूध पाजलेच गेले. आईचे दूध हे बाळाच्या विकासासाठी सर्वश्रेष्ठ मानले जाते.
स्तनदा मातांना होणारे फायदे
स्तनपानामुळे मातेचे गर्भाशय पूर्वस्थितीत येण्यास मदत होते.
मातेचा बांधा सुडौल होण्यास मदत होते.
प्रसूतीनंतर होणारा अतिरिक्त रक्तस्त्राव कमी होतो.
गर्भारपणात वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते.
स्तनपान केल्याने बाळ वारंवार आजारी पडत नाही.
आई आणि बाळात जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात.
आईचे दूध हे बाळासाठी पूर्णान्न असते. तरीही आजकाल बर्याच नवीन झालेल्या आई बाळाला अंगावर पाजण्यासाठी इतक्या उत्सुक नसतात. पण आईचे दूध बाळासाठी खूप आवश्यक असते. जन्मल्यानंतर पहिल्या एक तासाच्या आत बाळाला स्तनपान सुरू केले पाहिजे. पहिले सहा महिने फक्त स्तनपान हे बाळाला दिले गेले पाहिजे. त्यानंतर सॉलिड फूड सुरू करून पुढील सहा महिने त्याबरोबर स्तनपान सुरू ठेवले पाहिजे. डब्ल्यूएचओच्या नवीन धोरणानुसार स्तनपान हे बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत केले पाहिजे. या काळात मातेचा आहार खूप महत्त्वाचा असतो.
– डॉ. चेतना दहिवेलकर स्त्रीरोगतज्ज्ञ, नाशिक