सत्तासंघर्षाची आता सोमवारी सुनावणी

शिवसेनेच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नका

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी आता सोमवारी 8 ऑगस्टला होणार आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत ही जोपर्यंत याचिकांचा निर्णय लागत नाही तोपर्यंत कोणताच निर्णय निवडणूक आयोगाने घेऊ नये, असे निर्देशही सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीण एन.व्ही. रमना यांनी काल दिले. सर्वांच्या लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे न्यायालयाने म्हटले आहे.
ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत, तर शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज किशन कौल आणि महेश जेठमलानी, मुकुल रोहतगी सारखे दिग्गज विधिज्ञ यांनी कोर्टात युक्तिवाद केला. तर अरविंद दातार यांनी निवडणूक आयोगाची बाजू मांडली. बंडखोर 16 आमदारांच्या अपात्रतेवरून सुरू झालेली कायदेशीर लढाई आता शिवसेना कोणाची यावर येऊन पोहोचली आहे. शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत एक कॅव्हेट दाखल केले. यामध्ये त्यांनी ‘आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी केली होती.
एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ तब्बल 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केले. या सर्व घडामोडीनंतर आम्हीच खरी शिवसेना असा दावा शिंदे गटाने केला होता. आगामी काळात शिंदे गटाकडून शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर देखील दावा केला जाऊ शकतो, हे पाहता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल केले.
कोर्टाने निवडणूक आयोगाला निर्णय येईपर्यंत पक्षाच्या चिन्हासंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नका असे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील याचिकांवर निर्णय येईपर्यंत शिवसेनेकडेच धनुष्यबाण राहणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा दिला मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *