व्हिजन २०२२ – माझ्या नजरेतून
डॉ. संजय धुर्जड.
९८२२४५७७३२
नाशिक शहर तथा जिल्ह्याचा विचार केला तर असे निदर्शनास येते की, जिल्ह्यातील आरोग्य सेवा मुबलक प्रमाणात व उत्तम दर्जाची आहे. कोविड काळात महाराष्ट्र शासन आणि नाशिक महानगरपालिकेच्या वतीने चांगली सेवा पुरवण्यात आली होती. शासकीय आरोग्य सेवेसोबतच खाजगी आरोग्य सेवा ही त्याच तोडीची होती. त्यावेळी जिल्ह्याच्या बाहेरील रुग्णांसाठीही इथे सेवा देण्यात आली. अशाच प्रकारची आरोग्यसेवा गेल्या दहा वर्षात नाशिक मध्ये कार्यरत आहे ही आपल्या शहराच्या आणि जिल्ह्याच्या दृष्टीने समाधानकारक बाब आहे. येणाऱ्या पुढील काळात ही अशीच दर्जेदार सेवा नाशिककरांना मिळत राहणार यात काही शंका नाही
शहराचा विचार केला तर, शासनाच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटल तसेच संदर्भ सेवा रुग्णालय, शालिमार येथे गोरगरीब जनतेसाठी आरोग्यसेवा उपलब्ध आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्वच स्पेशलिटी उपचार पद्धती उपलब्ध आहेत. बाह्य रुग्ण तपासणी, अंतर रुग्ण सेवा तसेच ऑपरेशनची सुविधा चांगल्या प्रकारे दिली जाते. या दोन शासकीय इस्पितळांच्या व्यतिरिक्त नाशिकच्या लगत दोन मोठे वैद्यकीय महाविद्यालय आहेत. आडगावचे एम. व्ही. पी. चे मेडिकल कॉलेज तसेच घोटी सिन्नर हायवेवरील एस. एम. बी. टी. वैद्यकीय महाविद्यालय, यांच्यावतीने गोरगरीब व गरजू रुग्णांना उत्तम प्रकारे आरोग्य सेवा देण्याचे कार्य या दोन महाविद्यालयांच्या वतीने केले जाते, तसेच तिथे उत्तम प्रकारचे वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येकी किमान साडेसातशे खाटांचे दोन महाविद्यालय मिळून दीड हजारावर खटांची आरोग्य मंदिरे नाशिकच्या उत्तर आणि दक्षिण दिशेने कार्यरत आहेत. कोरोना काळात या सर्व शासकीय, मनपा संचलित तसेच वैद्यकीय महाविद्यालयांच्या हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांची सेवा घडली, यामुळेच नाशिकमध्ये कोरोनाची लाट पेलण्याचे सामर्थ्य निर्माण झाले.
शासकीय आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून नाशिक मधील खाजगी रुग्णालयांनी अनन्यसाधारण असे कार्य केले आहे. देशात पहिले खाजगी कोविड हॉस्पिटल सुरू करण्याचे श्रेय नाशिकला जाते. तद्नंतर अनेक रुग्णालयांनी कोविडच्या रुग्णांसाठी आपले रुग्णालय खुले केले. दोन्ही लाट मिळून किमान १७५ कोविड हॉस्पिटल मिळून ५००० खटांची सुविधा करण्यात आली. नाशिकच्या खाजगी आरोग्य यंत्रणेचा विचार केला तर गेल्या काही दशकांपासून नाशिकच्या आरोग्य सुविधांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. १९९० च्या पूर्वी नाशिक मध्ये मोठे हॉस्पिटल नव्हते. नागजी हॉस्पिटलच्या रूपाने पहिले अध्यायावत व सर्व सोयींनी युक्त असे क्रिटिकल केअर हॉस्पिटल सुरू झाले. सर्व प्रकारच्या इमर्जन्सी व क्रिटिकल केअर लागणाऱ्या रुग्णांची तिथे व्यवस्था होती. आयसीयू, सिटीस्कॅन सारख्या अद्यावत सुविधा उपलब्ध झाल्या. त्यानंतर काही नामांकित डॉक्टरांनी एकत्र येऊन ग्रुप प्रॅक्टिस करत अद्यावत व आधुनिक यंत्रणेसह हॉस्पिटल सुरू केले. पुढील पंधरा ते वीस वर्षात नाशकात अशा प्रकारचे अनेक हॉस्पिटल्स सुरू झाले. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कॅन्सर सर्जरी, किडनी ट्रान्सप्लांट, जॉइंट रिप्लेसमेंट यासारख्या उपचारांसाठी मुंबई आणि पुणे येथे जावे लागे. परंतु या आधुनिक आणि अद्यावत हॉस्पिटल सुरू झाल्यापासून या दोन मोठ्या शहरांकडे जाण्याचा ओघ कमी झाला. आता नाशिक मध्येच जवळपास सर्वच प्रकारचे अद्यावत हॉस्पिटल्स सुरू झाले आहे. त्यात कॉर्पोरेट हॉस्पिटल्सची ही भर पडली आहे. वोखार्ट, अपोलो, सह्याद्री, अशोका मेडिकव्हर यासारख्या कॉर्पोरेट संचलित हॉस्पिटल्समुळे नाशिकच्या आरोग्य सेवेमध्ये खूप मोठा बदल घडला आहे आणि भविष्यातही असाच बदल होणे अपेक्षित आहे.
कोविड महामारीनंतर गेल्या एक वर्षात हा बदल प्रकर्षाने जाणवत आहे. आरोग्य सेवा उच्च दर्जाची हवी म्हणून अनेक संस्था व डॉक्टरांचे ग्रुप पुढे सरसावले आहेत. गेल्या एक वर्षात एकंदरीत ६०० बेड संख्या वाढ झालेली आहे. पुढील दोन वर्षाच्या काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. दोन दशकांपूर्वी नाशिक मध्ये सुपर स्पेशालिटी सेवा देणारे मोजकेच तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध होते, परंतु गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये जशी डॉक्टरांची संख्या वाढली तशीच सुपर स्पेशलिटी तज्ञ डॉक्टरांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. कार्डिओलॉजिस्ट, कार्डियाक सर्जन, न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, किडनी स्पेशालिस्ट, प्लास्टिक सर्जन, हॅन्ड सर्जन, कॅन्सर सर्जन, यासारखे पदव्युत्तर शिक्षण घेऊन सुपर स्पेशलिटी तज्ञ म्हणून सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या संख्येत वाढ झालेली आहे. इतकंच नव्हे तर शहराच्या बाहेर जिल्ह्याच्या प्रमुख शहरांमध्ये जाऊन तिथे सेवा देणे सुरू केले. यामुळे ग्रामीण भागातील गरीब जनतेला त्यांच्या सेवेचा लाभ मिळत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत अनेक आजारावर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येते. नेमून दिलेल्या रुग्णालयांमध्ये ही सेवा देण्याचा परवाना शासनाकडून दिला जातो. महागड्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया रुग्णांना मोफत स्वरूपात सेवा मिळते. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी पाच लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार या हॉस्पिटलमध्ये मिळू शकतो. गरीब जनतेसाठी योजनेअंतर्गत उपचार व श्रीमंत अथवा मेडिक्लेम धारकांसाठी कॉर्पोरेट व इतर मोठे हॉस्पिटल उपलब्ध असल्याने समाजातील गरिबातल्या गरीब ते अतिशय श्रीमंता पर्यंत सर्वांना या शहरात उपचाराची संधी उपलब्ध झालेली आहे. आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने ही अत्यंत समाधानकारक तसेच भूषणावर बाब आहे.
|
|