महागाईपुढे डाळ शिजेना, कोणती भाजी करू?

गृहिणींपुढे गंभीर प्रश्‍न; भाजीपाला शंभरीपार!
नाशिक ः प्रतिनिधी
एकीकडे सर्वच प्रकारच्या डाळींचे भाव कडाडले असतानाच, भाजीपाल्याचे दरही शंभरीपार गेल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. भाजी तरी कोणती करावी? असा प्रश्‍न घराघरांत सतावत आहे.
दमदार पावसाला सुरुवात झाल्यापासून भाजीपाला दरात वाढ झाली आहे. संततधार पाऊस होत असल्याने शेतातच भाजीपाला पिवळा पडण्याचे प्रमाण वाढले असल्याने बाजारात येणार्‍या भाजीपाला आवकवर मोठा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे भाजीपाला दरात तेजी आली आहे. गवार 150 रुपये तर दुधी भोपळा प्रतिनग 25 ते 30 रुपये मिळत आहे. त्यात डाळी, कडधान्य, किराणामालाचेही भाव चढेच असल्याने गृहिणींची स्वयंपाकाची कसरत होत आहे.
पावसाळ्यात भाजीपाला मुबलक येत असला तरी अतिवृष्टीमुळे भाजीपाला सडतो, पिवळा पडतो, त्याशिवाय गवारसारख्या भाज्यांना उष्ण वातावरण हवे असते. त्यामुळे पावसाच्या वातावरणाचा परिणाम होत असल्याने आवक कमी होत आहे. परिणामी, गवारचे भाव 150 रुपये किलोपर्यंत वाढले आहेत. टोमॅटोची आवक वाढल्याने दर कोसळले आहेत.
पालेभाज्या पावसाळ्यात लवकर खराब होतात. त्यामुळे कोरडी आणि विनामातीच्या भाजीला चांगला भाव मिळतो. त्यामुळे मेथी, पालक, शेपू, कांदापात, कोथिंबीर यांना जुडीला 40 ते 50 रुपये मोजावे लागत आहे. उन्हाळ्यात वीस ते तीस रुपयांना तीन लिंबू मिळत होते. ते आता दहा रुपयांत तीन तर किलोला 70 रुपये मिळत आहे. चांगल्या आल्यालाही 60 ते 70 रु. किलो भाव
आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *