नाशिक :प्रतिनिधी
गणेशोत्सवास प्रारंभ झाला आहे. गेली दोन वर्षे कोरोना काळामुळे गणेश भक्तांवर काही मर्यादा आलेल्या होत्या. परंतु यावर्षी कोरोनामुक्त गणेशोत्सव साजरा केला जात असल्यामुळे गणेशभक्तांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे नाशिकमध्ये गणेश मंडळांकडून साकारण्यात आलेले विविध देखावे त्याचप्रमाणे गणेश दर्शनासाठी भाविकांची मोठी मोठी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून खास गणेश भक्तांसाठी सिटीलिंकच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. दिनांक ३ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर दरम्यान या जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे ३ ते ८ सप्टेंबर कालावधीत सायंकाळी १८.०० वाजेपासून पहाटे २ वाजेपर्यंत या जादा बसेस सोडण्यात येणार आहे. यामध्ये नवीन सी बी एस ( सिव्हील हॉस्पिटल ) ते सिम्बोईसिस, नवीन सीबीएस ( सिव्हील हॉस्पिटल )ते बारदान फाटा व नाशिकरोड ते नवीन सी बी एस (सिव्हील हॉस्पिटल) या मार्गावर प्रत्येकी ४ बसेस सोडण्यात येणार आहे. तर नवीन सी बी एस (सिव्हील हॉस्पिटल) ते अंबड, नवीन सी बी एस (सिव्हील हॉस्पिटल)ते पाथर्डी गाव, नवीन सी बी एस (सिव्हील हॉस्पिटल) ते आडगाव व नाशिकरोड ते निमाणी मार्गे जेलरोड या मार्गावर प्रत्येकी 2 अशा एकूण 20 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.तरी जास्तीत जास्त भाविकांनी या जादा बसेसचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे..