सटाणा प्रतिनिधी
सटाणा शहरातील प्रतिष्ठित होलसेल किराणा व्यापारी राजेंद्र राका यांच्या स्कॉर्पिओ कार (एमएच ४१ सी ६४९९) व ६ लाख रुपयांची रोकड चालकानेच लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून राजेंद्र राका यांनी याप्रकरणी सटाणा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलीससूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राजेंद्र राका यांचा होलसेल किराणा व्यवसाय असून संपूर्ण बागलाण तालुक्यात ते किराणा माल वितरित करतात. गुरुवारी (दि.७) राका यांचे वसुली कर्मचारी व चालक विनोद सरदार परदेशी (रा. राका मिल कंपाऊंड, मालेगाव रोड) हे नेहमीप्रमाणे तालुक्यात वसुलीसाठी गेले होते.६ लाख रुपयांची वसुली करून सटाण्याकडे येत असतांना देवळा रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील पंचर दुकानाजवळ स्कॉर्पिओ थांबवून चालक विनोद परदेशी याने वसुली कर्मचाऱ्याला खाली उतरवून स्टेपनीचा पंचर काढण्याचा बहाणा करत स्कॉर्पिओसह पळ काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान राका यांची स्कॉर्पिओ देवळा रस्त्यावरील तुर्कीहुडीजवळ बेवारस स्थितीत आढळून आली असून सटाणा पोलिसांनी तुर्कीहुडी येथून स्कॉर्पिओ ताब्यात घेतली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय वाघ करीत आहेत.