पिंपळगाव बसवंत येथे पतीनेच केला पत्नीचा खून !
पिंपळगाव बसवंत: सतत पैशाची मागणी करून पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देणाऱ्या नवऱ्यानेच माहेरी आलेल्या बायकोचा खून करत मृतदेह फेकून दिला आहे. याबाबत पतीवर खुनाचा गुन्हा तर मानसिक व शारिरीक छळ केल्याप्रकरणी कुटुंबातील अन्य चार सदस्यांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथील बाळू हरी निफाडे यांची मुलगी योगिता उर्फ दिपाली निफाडे हिचे सैय्यद पिंप्री येथील राजेश नामदेव ढिकले यांच्याशी विवाह गत काही वर्षांपूर्वी झाला होता. सासरचे मंडळी सतत दिपाली हिच्याकडे पैशाची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ करीत होते. गेल्या काही दिवसांपूर्वी दिपाली ही सासरच्या मंडळींना सोडून शिरवाडे वणी गावी माहेरी आली होती. पती राजेश ढिकले ही गत सहा दिवसांपूर्वी सासरी येऊन दीपलीला घेऊन गेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी बघितले होते. त्यानंतर पती राजेश ढिकले यांनी पत्नी बेपत्ता झाल्याची माहिती माहेरच्या कुटुंबियांना दिली.पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्या बाबत तक्रार देखील दाखल करण्यात आली.गेल्या पाच दिवसापासून बेपत्ता असलेल्या दिपाली राजेश ढिकले (वय ३२) रा. – सय्यद पिंपरी. यांचा संशयास्पद मृतदेह पाचोरे फाटा शिवारात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत प्रकरणाचा सखोल तपास केला. याबाबत पती राजेश ढिकले यास अटक करत कसून चौकशी अंती व फिर्यादी बाळू हरी निफाडे रा. शिरवाडे वणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी रात्री उशिरा पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात पती राजेश ढिकले, यांच्या विरोधात खुनाचा तर अन्य सासू सुमनबाई ढिकले, सासरे नामदेव ढिकले, देर योगेश ढिकले, सर्व रा. सैयद पिंप्री नाशिक व नणंद
रेखा शंतनू ओतुरकर रा. पुणे (पत्ता माहिती नाही)आदींवर कौटुंबिक हिंसाचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आहे.
पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे अधिक तपास करत आहेत.