सत्तर वर्षानंतर ‘चित्ता परत येतोय
17 सप्टेंबर 2022 रोज देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आफ्रिकन चित्त्यांची भारतात पुनर्स्थापना करण्यात येणार आहे. जेव्हा पंतप्रधान नामिबीयातून आणलेल्या आठ चित्त्यांना येथे सोडतील तेव्हा हा क्षण देशासाठी केवळ अभिमानाचीच नाही तर वन्यजीव संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक दिवस असणार आहे.
70 वर्षांपूर्वी भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांचे भारत भूमीवर परत येणे हा निश्चितच आपल्यासाठी गौरवाचा, आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असेल तसेच राष्ट्रीय वने आणि वन्यजीव संवर्धनाकरिता एक मैलाचा दगड म्हणुन या घटनेला म्हणावं लागेल.
भारताला वन्यजीव संरक्षणाचा मोठा इतिहास आहे. सर्वात यशस्वी वन्यजीव संरक्षण उपक्रमांपैकी एक प्रोजेक्ट टायगर 1972 मध्ये सुरू करण्यात आला होता. त्याने केवळ वाघांच्या संवर्धनाचे नव्हे तर संपूर्ण परिसंस्थेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी हातभार लावला आहे. ज्यात छोट्या किड्या कीटकांपासून ते महाकाय वृक्षांपर्यंत आणि मधमाशी पासून वाघापर्यंत या सर्वांचेच संवर्धन आणि संरक्षण झाले आहे. याचप्रमाणे भारतातून नामशेष झालेल्या चित्त्याचा पुन्हा परिचय आणि पुनर्वसन हा भारतीय वन्यजीव संवर्धनाच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण निर्णय असणार आहे.
एकेकाळी भारताच्या मोठ्या भूभागावर जंगली चित्त्यांचा वावर होता परंतु त्यांचा अधिवास नष्ट झाल्याने तसेच ज्या काळवीटांची व हरणांची शिकार करून ते जगत असत त्यांची संख्या कमी झाल्याने चित्ते भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर आले, याशिवाय राजेशाही शिकारी मध्ये चित्त्यांचा वापर होत असल्यामुळे त्यांची बंद अधिवासात प्रजनन झाले नाही आणि त्यामुळे चित्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आणि अखेरीस भारतातील शेवटचा जंगली चित्ता 1951 मध्ये आंध्र प्रदेशात दिसला, त्यानंतर 1952 मध्ये भारत सरकारने अधिकृतरित्या चित्ता भारतातून नामशेष झाल्याची घोषणा केली.
नैसर्गिक कारणांमुळे भारतातून नामशेष झालेला हा इतिहासातील एकमेव प्राणी आहे.
वन्यजीव संवर्धनाच्या नमूद केलेल्या उद्दिष्टांशी चित्यांची पुर्नस्थापना सुसंगत आहे की नाही यावरील वादविवाद, चित्ता नामशेष झाल्याची पुष्टी झाल्यानंतर लगेच सुरु झाला. 1955 मध्ये आंध्र प्रदेशच्या राज्य वन्यजीव मंडळाने प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील किमान दोन जिल्ह्यांमध्ये एशियाटिक चित्ता पुन्हा आणण्याची सूचना केली. १९६५ मध्ये एम कृष्णन यांनी एका वृत्तपत्रांमध्ये आपल्या लेखात चित्त्याच्या प्रस्थापनेबाबत सविस्तर असे लिहिले. 1984 मध्ये दिव्या भानुसिंग यांनी पर्यावरण आणि वन मंत्रालयासाठी भारतातील चित्त्याच्या स्थितीवर एक शोधनिबंध सादर केला हा शोध निबंध नंतर IUCN (International Union for Conservation of Nature) कमिशनच्या कॅट स्पेशलिटी ग्रुपला पाठवण्यात आला. 1970 च्या दशकात भारतीय पर्यावरण विभागाने औपचारिकपणे इराण सरकारला चित्ता भारतात सादर करण्यासाठी विनंती करण्याचे पत्र लिहिले आणि वरवर पाहता त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. इराणच्या क्रांतीमध्ये इराणचा बादशहा पदच्युत झाल्यानंतर ही चर्चा थांबली आणि नंतर त्या संदर्भातील वाटाघाटी पुढे झाल्या नाहीत. त्याचबरोबर 2000 च्या दशकात हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) मधील भारतीय शास्त्रज्ञांनी इराणमधून चित्त्याच्या क्लोन करण्याची योजना प्रस्तावित केली परंतु ती देखील यशस्वी होऊ शकली नाही. नंतर ऑगस्ट 2009 मध्ये तात्कालीन पर्यावरण मंत्री श्री जयराम रमेश यांनी इराणशी चित्ता पुनर्वसनाबाबत चर्चा केली परंतु इराण या कल्पनेला वचनबद्ध करण्यास नेहमीच संकोच करत आला होता. असे म्हटले जाते की इराणला चित्त्याच्या बदल्यात आपला सिंह हवा होता त्यामुळे इराणमधून चित्ता आणण्याची योजना अखेर 2010 मध्ये वगळण्यात आली. तत्पूर्वी केनिया सरकारने चित्ते भारतात पाठवण्याची ऑफर 1980 च्या दशकात नोंद दिली होती त्याच अनुषंगाने 2009 मध्ये WII च्या अहवालात आफ्रिकेतून चित्ता शोधण्याची शिफारस केली गेली होती त्या अनुषंगानेच सप्टेंबर 2009 मध्ये पर्यावरण आणि वन मंत्रालयाने WII ला राजस्थानच्या गजनेर येथे या विषयावर एक चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली तेव्हा चित्ता पूर्ण स्थापना योजनेत लक्षणीय प्रगती झाली ही बैठक वाइल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया (WTI) या दिल्ली स्थित एका प्रख्यात एनजीओच्या उपस्थितीत आयोजित केली होती. चित्ता संवर्धन निधी, IUCN आणि इतर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधि तसेच अनेक राज्यांचे उच्चपदस्थ वनाधिकारी यासाठी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान निवडलेल्या चार राज्यांमध्ये सात संभाव्य पुनरपरिचय स्थळांचा सविस्तर सर्वेक्षण अहवाल तयार करून त्याच्या शिफारिशीस मान्यता देण्यात आली होती. यावेळी भारतातील राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला होता. या व्यतिरिक्त तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राचा ही विचार यावेळी करण्यात आला होता.
या सर्वेक्षणाने भारतातील चित्त्यांच्या पुनर स्थापनेचा मार्ग तयार केला आणि तो भारतीय वन्यजीव संस्थेने अतिशय अभ्यास पूर्वक योजिला आहे. त्या अनुषंगाने तज्ञांनी तीन प्रदेश निवडून ज्यात चित्ता लोकसंख्येला आधार देण्याची क्षमता आहे ज्यामध्ये मध्यप्रदेशातील नौरादेवी वन्यजीव अभयारण्य , कुनो राष्ट्रीय उद्यान आणि राजस्थान मधील जैसलमेर भागातील शाहगढ अभयारण्याचा समावेश होता. शेवटी सर्व बाबींचा विचार करता मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानाची चित्ता पुर्नस्थापनेसाठी निवड अंतिम करून जानेवारी 2022 मध्ये पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारतात चित्त पुन्हा आणण्यासाठी ची कृती योजना सुरू केली.
चित्ता पुर्नस्थापन प्रक्रियेला मा. सर्वोच्च न्यायालयाने 28 जानेवारी 2020 च्या आदेशान्वये आफ्रिकन चित्ता भारतात आणण्याकरता परवानगी दिली आहे आणि ही पूर्ण प्रक्रिया IUCN च्या मार्गदर्शक सूचनांन प्रमाणे होणार आहे त्याचप्रमाणे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) हे देखील या पूर्ण प्रकल्पाची अतिशय बारकाईने अंमलबजावणी करणार आहेत. यासाठी मोठा वैज्ञानिक व तंत्रशुद्ध अभ्यास यातील तज्ञ लोकांनी केला आहे.
चित्ता हे नाव मूळचे संस्कृत शब्द चित्रय (Painted) यावरून घेण्यात आले असून चित्ता हा Acinonyx jubatis या संघातील आहे पॅंथेरा या संर्वगातील नाही. रॉयल बंगाल टायगर म्हणजेच वाघ, भारतीय बिबट्या, हिम बिबट्या, क्लाऊड बिबट्या हे सर्व पॅंथरा (Panthera) संवर्गातील आहेत. या मोठ्या मांजरीच्या यादीत चित्ता सहाव्या क्रमांकावर आहे. चित्ता हा एक सुंदर, देखणा, रुबाबदार आणि चपळ प्राणी आहे.
अन्नसाखळीतील अतिशय महत्त्वाचा असा हा घटक असल्यामुळे तसेच चित्त्याच्या पुनर्रस्थापनेमुळे गवताळी प्रदेशाचे, खुल्या झुडपी जंगलांचे व्यवस्थापन त्यांचे संरक्षण व संवर्धन होण्यास मोठी मदत होणार आहे. चित्याची पुर्नस्थापना करणे हे वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने धाडसी पाऊल म्हणावे लागेल आणि चित्ता संवर्धनातील हा जागतिक स्तरावरील महत्त्वाचा प्रयोग असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
या सर्व बाबींचा विचार करूनच मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानाची याकरता निवड करण्यात आली असून माननीय सर्वोच्च न्यायालयाने एनटीसी ला मार्गदर्शन करण्यासाठी तीन सदस्य समितीची स्थापना केली आणि समितीला दर चार महिन्यांनी प्रगतीवार अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे. वन्यजीवांसाठी तांत्रिक उपाय पुरवणाऱ्या स्ट्रोफेस तंत्रज्ञानाने कुणा नॅशनल पार्क मध्ये या चित्त्यांकरीता लक्ष ठेवणारी यंत्रणा लागू केली आहे. या चित्त्यांचे व्यवस्थापन ही अतिशय आव्हानात्मक आणि क्लिष्ट बाब असुन याकरिता मोठी आर्थिक तरतूद शासनाने केलेली आहे. याव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आणि कुशल मानव संसाधनाची आवश्यकता चित्त्यांच्या देखरेख ही करिता आणि निरीक्षणाकरता लागणार आहे. काही वर्षांपूर्वी अशाच एका वाघाच्या पुनर्रस्थापन प्रक्रियेचा मी स्वतः भाग असल्यामुळे अशा प्रकारच्या प्रक्रियेत किती अडचणी येतात आणि हे खूप आव्हानात्मक असल्याचा माझा अनुभव आहे.
मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यांच्या सीमेवर वसलेले कुनो-राष्ट्रीय उद्यान जे अरवली पर्वतरांगांच्या नयन रम्य टेकड्यांनी वेढलेले असून राष्ट्रीय उद्यानाच्या कुशीत वाहणारी कुनो नदी तिच्या सपाट आणि विस्तिर्ण काठावरच्या प्रदेशात डोलणारे गवताचे थवे या नवीन पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. नैसर्गिक सौंदर्याने आणि जैवविविधतेने नटलेला हा सुंदर परिसर या नवीन पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे.
कुनो राष्ट्रीय उद्यान ३४४.६८ वर्ग किलोमीटर अशा विस्तीर्ण भागात व्यापले असून येथील जंगल काठेवाडी गीर शुष्क पानझडी वनांच्या प्रकारात मोडते. जैवविविधतेने संपन्न अशा या प्रदेशात 175 पेक्षा जास्त जातीचे पक्षी आहेत त्याचप्रमाणे शेकडो वन्यजीवांच्या आणि इतर प्राण्यांच्या प्रजाती येथे आढळतात.
कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील गावातील जनावरांच्या लसीकरणाचे काम पूर्ण झाले असून परिसरातील सर्व गावांमध्ये जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. लगतच्या गावातील 457 लोकांना चित्ता मित्र बनवण्यात आले आहे. चित्त्यांच्या अधिवासासाठी अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. पाण्याच्या व्यवस्थेस मोठे बंदिस्त क्षेत्र (Enclosures) आणि इतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्ण झाल्या असून वन्यजीवांची घनता वाढवण्यासाठी नरसिंहगड येथून चितळे आणून सोडण्यात आली आहेत. तज्ञांच्या मते या परिसरात चित्त्यांना शिकारी करीता तृणभक्षी प्राण्यांची घनता पुरेशी आहे. WII आणि NTCA या सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
सुरुवातीला या चित्त्यांना दोन ते तीन आठवडे स्वतंत्र बंदिस्त जागेत ठेवण्यात येईल येथे त्यांच्या हालचालींवर तज्ञांकडून बारीक लक्ष ठेवण्यात येईल आणि येथील वातावरणात ते समरस होतील याबाबत निरीक्षण नोंदवण्यात येईल. हे सर्व चित्ते ट्रेकिंग कॉलरने सज्ज असतील आणि २४ तास त्यांचे निरीक्षण केले जाईल. या चित्त्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. मांजर कुळातील प्राण्यांना त्यांचे क्षेत्र प्रस्थापित करण्याची सवय असल्याकारणाने त्यांना या क्षेत्राशी समरस होण्याकरिता काही काळ बंदिस्त परंतु अजुन मोठ्या क्षेत्रात सोडले जाईल.
येथील वन विभागाच्या पथकाने नामी-बियातील चित्ता व्यवस्थापन तंत्राचे परिपूर्ण प्रशिक्षण घेतले आहे तसेच WII, NTCA, चित्त्यांचे तज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी, ट्रेकिंग करणारे शास्त्रज्ञ असा बराच मोठा चमू देखील येथील वन विभागाच्या पथकाला वेळोवेळी आवश्यक ते मार्गदर्शन करणार आहेत.
या नवीन आलेल्या पाहुण्यांना कुणो राष्ट्रीय उद्यानात आपला जम बसवणे तेवढे सोपे नसणार आहे त्यांचा सामना येथे बिबट्यांशी, तडस, जंगली कुत्रे, अस्वल, लांडगे यांच्याशी होणार आहे. या अनुषंगाने कुनो राष्ट्रीय उद्यानात आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. आसपासच्या परिसरात जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली असल्यामुळे स्थानिकांचे सहकार्य लाभेल. त्यामुळे चित्ता पुर्नस्थापनेचा हा प्रयोग वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने जेवढा आव्हानात्मक आहे तेवढाच ऐतिहासिक म्हणावा लागेल आणि या रूबाबदार प्राण्याच्या येण्याने पर्यावरणीय पर्यटनासाठी या भागात मोठी चालना मिळून सभोवतालच्या भागाचा आर्थिक विकास होईल. भारताच्या पंतप्रधानांच्या जन्मदिनानिमित्त चित्त्यांचं होणार पूर्णस्थापन हे या प्रकल्पाच महत्त्व अधोरेखित करतं हे वेगळ्या ने सांगण्याची आवश्यकता नाही . त्यामुळे येणाऱ्या 17 तारखेला आपण ऐतिहासिक आणि गौरवशाली अशा घटनेचे साक्षीदार होणार आहोत हे मात्र नक्की.
-हिरालाल रमेश चौधरी (वनपरिक्षेत्र अधिकारी)