स्वाइन फ्लूने भरवली धडकी
नाशिक : गोरख काळे
नाशिक शहरात स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या वाढत असून, आतापर्यंत 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 142 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढल्याने पालिका प्रशासन अलर्टवर आले आहे. दरम्यान, दोन वर्षे कोरोनाची भयंकर परिस्थिती असल्याने त्यावेळी या आजाराकडे लक्ष गेले नाही. मात्र, या वर्षी स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे.
जुलै महिन्यापासून पावसाने शहरात मुक्काम दिला आहे. त्यामुळे वातावरणातील बदल आणि पाऊस यांमुळे नाशकातील वातावरणात बदल झाला आहे. या बदलामुळे साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. व्हायरल तापाचे प्रमाण सर्वाधिक असून, स्वाइन फ्लूच्या आजारामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. स्वाइन फ्लूने आतापर्यंत सात रुग्ण दगावल्याने नागरिकांमध्ये स्वाइन फ्लूूची धास्ती वाढत आहे. सतर्क झालेल्या महापालिका प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. शहरात सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. मागील आठवड्यात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. स्वाइन फ्लू झाल्यास रुग्णांमध्ये घसा खवखव करणे, ताप येणे, खोकला, अशक्तपणा आणि सर्दी ही लक्षणे दिसून येतात. दरम्यान, अंग दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असून, बाहेर फिरताना चेहर्यावर मास्क घालणे व भरपूर पाणी पिणे असे आवाहन करण्यात आले आहे.
डेंग्यूचेही संकट आठवड्यात 25 रुग्ण
एकीकडे स्वाइन फ्लूने डोके वर काढले असताना आता डेंग्यूने देखील डोके वर काढल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यात शहरात 25 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाला याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
दोन रुग्णालयांना नोटिसा
महापालिकेला खासगी रुग्णालयाने स्वाइन फ्लूचा रिपोर्ट लवकर देण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, याकडे लक्ष न देणार्या सिडकोतील लाइफकेअर व पंचवटीतील सुधर्म या दोन रुग्णालयांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
– डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा