स्मार्ट काम, वर्षभर थांब

नाशिक : अश्‍विनी पांडे
स्मार्ट सिटी कंपनीकडून शहराच्या विविध भागांमध्ये खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसामुळे आधीच रस्त्यांची वाट लागली असताना स्मार्ट कंपनीने खोदलेले रस्ते आता नागरिकांची डोकेदुखी ठरत आहेत. कामाला गती नसल्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीच्या कोंडीवरही होत आहे.
स्मार्ट सिटी कंपनीने कधी गॅसलाइन तर कधी विद्युतीकरणासाठी रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी खोदून ठेवले आहे. त्याचा परिणाम शहरातील वाहतूक कोंडीवर होत असून, खोदलेल्या रस्त्यातून जाताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नाशिकच्या टिळकपथ भागातील खोदलेल्या रस्त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. टिळकपथ येथील रस्त्याच्या कडेला असलेले चांगल्या दर्जाचे पेव्हरब्लॉक काढून ठेवले. त्यानंतर चार महिने हा रस्ता तसाच पडून होता. आता काम सुरू झाले असले तरी पेव्हर ब्लॉक आणून ठेवले आहेत. नवीन पेव्हर ब्लॉक व्यावसायिकांच्या दुकानांसमोरच ढीग घालून ठेवल्याने व्यावसायिकांचीही मोठी कोंडी झाली आहे. दुकानांसमोर शहरात येणारे इतर नागरिक वाहने लावतात. त्यामुळे रविवार कारंजा ते रेडक्रॉस सिग्नलपर्यंत वाहतुकीची दररोज कोंडी होत आहे. या रस्त्यावर वाहने चालविणे मोठे जिकिरीचे झाले आहे. महात्मा गांधी रस्त्याच्या कडेला वाहने पार्क केल्यास टोइंग केले जातात. त्यामुळे अनेक नागरिक टोइंग कारवाईपासून वाचण्यासाठी वाहनधारक टिळकपथ भागातच वाहने पार्क करतात. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *