चालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता – जी.आर.संघाप्पा

 

सरकारवर अवलंबून न राहता संस्थेचे संघटन अधिक मजबूत करा – जी.आर.संघाप्पा

नाशिक :प्रतिनिधी

देशाच्या दळणवळणात अतिशय महत्वाचा घटक असलेल्या आणि अर्थव्यवस्थेच्या चक्रात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या चालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सिमटाचे जनरल सेक्रेटरी जी.आर.संघाप्पा यांनी केले.नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट संघटनेच्या वतीने चालक दिनाच्या निमित्ताने स्वामीनारायण हॉल, नवीन आडगाव नाका आयोजित सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस दिल्लीचे अध्यक्ष अमृतलाल मदान, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत, उपाध्यक्ष सुरेश खोसला, माजी अध्यक्ष मलकितसिंह बल, ए.आय.एम.टी.सी.चे संचालक प्रकाश गवळी, नॉर्थ झोन उपाध्यक्ष जयपाल सिंग, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, ए.आय.एम.टी.सी.चे संचालक विजय कालरा, प्रवासी बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल, नाशिक सायकलिस्ट अध्यक्ष किशोर माने, मासिआचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, ए.आय.एम.टी.सी.चे संचालक बाळासाहेब कलशेट्टी, प्रमोद भावसार, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी, चेअरमन महेंद्रसिंग राजपूत, व्हा.चेअरमन भगवान कटिरा यांच्यासह नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएनचे तसेच राज्यातील सव्वीस जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जी.आर.संघाप्पा पुढे म्हणाले की, कुठलीही संस्था ही स्वतः अतिशय मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी संस्थेचे संघटन अधिक मजबूत करण्यात यावे. तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर कार्यकारिणी अतिशय मजबूत करण्यात येऊन स्वयंपूर्ण बनावे. कारण शासनाच्या भरवश्यावर बसून संस्था उद्देश साध्य करू शकत नाही. वाहतूकदार एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाला टॅक्सच्या माध्यमातून महसूल उपलब्ध करून देते त्याच्या तुलनेत शासनाकडून कुठल्याही आवश्यक सुविधा पुरविल्या जात नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, वाहतूकदारांना मिळत असलेल्या सुविधा या अतिशय तुटपुंज्या असून अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणारे वाहतूकदार अतिशय अडचणीत आहे. वाहतूकदाराना रस्त्यावर वाहतूक करत असताना मिळणारी वागणूक अतिशय चुकीची असून ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे संघटन अतिशय मजबूत करत चालकांच्या पाठीशी आपल्याला सक्षमपणे उभे रहावे लागेल. त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक संघटनात्मक पातळीवर करावी लागेल असे सांगत सिमटाच्या वतीने नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएनला आवश्यक ती मदत करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस दिल्लीचे अध्यक्ष अमृतलाल मदान म्हणाले की, भारतभरात काम करणाऱ्या वाहतूकदारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपण तत्परतेणे काम करत आहोत. वाहतूकदारांना राज्याबाहेर प्रवास करत असताना राज्यांच्या बॉर्डरवर यंत्रणेकडून नाहक त्रास दिला जातो. तसेच आर्थिक लूट देखील केली जात आहे याबाबत आवाज उठविण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी अध्यक्ष मलकितसिंह बल, ए.आय.एम.टी.सी.चे संचालक प्रकाश गवळी, नॉर्थ झोन उपाध्यक्ष जयपाल सिंग, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी केले.

चालकांना रस्ते वाहतूक व नियमांचे धडे

चालक दिनाच्या निमित्ताने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत,वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव भगत यांनी चालकांना रस्ते वाहतूक व नियमांचे धडे गिरवित सुरक्षित वाहतूक करण्याचे आवाहन केले.

चालकांनी घेतला आरोग्य शिबिर लाभ

चालक दिनाचे औचित्य साधत नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्टच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी करण्यात आली. याचा चालकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरास वाहतूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार

ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या सोहळ्याप्रसंगी नवनियुक्त अध्यक्ष अमृतलाल मदान यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *