स्वबळाची उबळ

स्वबळाची उबळ
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने केलेली महानगरपालिका प्रभाग रचना, आणि जिल्हा परिषदांची गट आणि पंचायत समित्यांची गण रचना रद्द करण्यात आल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याचा आदेश महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिल्यानंतरही निवडणूक प्रक्रिया थंडावलेली आहे. या निवडणुका कधी होतील? हा एक प्रश्न असला, तरी सर्वच प्रमुख आणि लहान पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीत राजकीय आघाड्या किंवा युती करण्यावर चर्चा सुरू असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा मनसुबा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केला आहे. यात विशेष नावीन्य नाही. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पटोले यांनी विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात जेथे जातील तेथे त्यांनी स्वबळाचे तुणतुणे वाजविले. मध्यंतरीच्या काळात त्यांनी आपली ही भाषा बंद केली होती. आता त्यांना पुन्हा एकदा स्वबळाची उबळ आली आहे. स्वबळावर किंवा युती/आघाडी करुन निवडणुका लढवायच्या याचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. पक्षनेतृत्वाने काय तो निर्णय घ्यायचा असतो. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा अधिकार प्रदेश काँग्रेसला दिला असल्याचा दावा पटोले यांनी मागे एकदा केला होता. त्यावेळी ते स्वबळाची भाषा करत होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना काँग्रेसची भूमिका शिवसेनेच्या विरोधात होती. मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना काँग्रेसला त्यावेळी मान्यही नव्हती. त्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आता महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात नसले, तरी महाविकास आघाडी अस्तित्वात असल्याचा दावा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून केला जात असला, तरी त्यांच्यात ताळमेळ नाही. स्थानिक परिस्थिती पाहून निवडणुका स्वबळावर किंवा आघाडी करुन लढवल्या जातील, असे प्रत्येक पक्षाचे नेते सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची औपचारिक चर्चा अथवा बोलणी सुरू झालेली नाही. त्यामुळे कोणाच्याही वक्तव्याला महत्व नाही.
भाजपाचे प्रयत्न
महाविकास आघाडीत ही परिस्थिती असताना भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांच्यातही अद्याप कोणत्याही प्रकारची चर्चा/बोलणी नाही. शिंदे गट आणि भाजपा यांच्यात युती होणार, हे जवळपास निश्चित आहे. या युतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा समावेश होणार काय? हाच प्रश्न आहे. भाजपा-मनसे युतीची शक्यता वर्तविली जात असली, तरी कोणताही ठोस निर्णय दोन्ही पक्षांनी घेतलेला नाही. भाजपाला मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची असल्याने शिंदे गटाची मदत घेतली जाणार आहे. याशिवाय मनसेला सोबत घेण्याचे भाजपाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी मनसे प्रमु़ख राज ठाकरे यांचे मन वळविण्याचे प्रयत्न प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. राज ठाकरे यांनी आपले पत्ते उघड केले नसल्याने भाजपा अद्यापही आशेवर आहे. मनसेच्या यशाचा आलेख दिवसेंदिवस घसरत असल्याचे लक्षात घेता राज ठाकरे यांनाही भाजपाशी युती करण्याबाबत चाचपणी करत आहेत. प्रश्न केवळ वाटाघाटींचा आहे. राज्यातील इतर लहान पक्षही मोठ्या पक्षांशी युती किंवा आघाडी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपा, मनसे आणि शिंदे गट यापैकी कोणालाही स्वबळावर स्थानिक संस्थामध्ये सत्ता मिळण्याची खात्री नसल्याने युती करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. महाविकास आघाडी एकत्रित लढणार काय? यावर या तिन्ही पक्षांची गणिते अवलंबून आहेत. निवडणुका जाहीर होतील तेव्हाच खर्‍या अर्थाने युती करण्याच्या प्रयत्नांना वेग येईल. त्यावेळी जागावाटप हाच कळीचा मुद्दा ठरणार आहे. भाजपा, शिंदे गट मनसेशी युती करण्याच्या प्रयत्नात असताना काँग्रेसच्या नाना पटोले यांना स्वबळाची गरज वाटत असेल, तर तो त्यांचा प्रश्न असेच म्हणावे लागेल. पटोले यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘त्यांची इच्छा’ अशा शब्दांत उत्तर देऊन टाकले.
शक्य आहे काय?
देशात आणि महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था फार चांगली नाही. स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसला परिस्थिती अजिबात अनुकूल नाही. देशभरात भाजपाला रोखण्यासाठी विरोधक एकत्र येण्याचा प्रयत्न करत असताना पटोले यांची स्वबळाची भाषा म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव वाढविण्याची एक खेळी असल्याचे दिसते. मूळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापेक्षा काँग्रेसला आज आघाडीची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. त्यांना त्या लढण्याची संधी मिळायला हवी. कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम आम्ही दूर केला असून, सर्व महापालिकांच्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे पटोले यांनी नाशिकमध्ये सांगितले. स्थानिक निवडणुका कार्यकर्त्यांसाठी असण्याविषयी वाद नाही. मात्र, काँग्रेसची सध्याची एकूणच ताकद पाहता स्वबळावर निवडणुका लढविणे म्हणजे एक प्रकारचा जुगार म्हणता येईल. स्थानिक पातळीवर काँग्रेस कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी जितकी जवळीक आहे तितकी शिवसैनिकांशी नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेच्या बाबतीत तसेच आहे. मात्र, शिवसेनेत फूट पाडणारे एकनाथ शिंदे आणि त्यांना मदत करणार्‍या भाजपाला धडा कट्टर शिवसैनिक धडा शिकवू पाहत असले, तरी त्यांना दोन्ही काँग्रेसशी जुळवून घेण्याची वेळ येऊ शकते. पटोले आज काहीही म्हणत असले, तरी स्थानिक नेत्यांना आघाडी करण्याची गरज वाटू शकते. त्यावेळी स्थानिक नेत्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले जाण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी स्थानिक नेत्यांना तसे अधिकार देण्याचे सूचित केले आहे. तोच कित्ता पटोले यांना गिरवावा लागण्याची शक्यता दिसते. सर्वच ठिकाणी तिन्ही पक्षांची आघाडी होईल, याची खात्री नसल्याने काही ठिकाणी आघाडी, तर काही ठिकाणी स्वबळ असेच चित्र दिसू शकेल. पटोले यांनी घोषणा केली अशी, तरी ती काही अंतिम ठरत नाही. निवडणुका जाहीर होतील तेव्हाच ते खरी भूमिका घेतील. तूर्त स्वबळाची चर्चा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *