मुले पळविणारा समजून जमावाने बदडले
नाशिक : प्रतिनिधी
सद्या नाशिक शहरामध्ये मुले पळविण्याची मोठी अफवा पसरली आहे. दोन दिवसांपूर्वी मुले पळविणारे समजून दोन जणांना मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच काल वडाळा भागात बुरखा घालून प्रेयसीला भेटण्यास आलेल्या प्रेमवीराला जमावाने धु धु धुतल्याने प्रेयसीला भेटावयास येणे या प्रियकराला चांगलेच महागात पडले आहे.
त्याचे झाले असे वडाळा गावात राहणार्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिचा प्रियकर आला. त्याने बुरखा घातलेला होता. मात्र, त्याच्या चालण्याच्या लकबीवरुन ही महिला नाही तर पुरुष असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. सद्या नाशिकमध्ये मुले पळविणार्यांची टोळी फिरत असल्याच्या अफवांचा बाजार उठला आहे. त्यामुळे बुरखा घालून हा युवक मुले पळविण्यास आला असा गैरसमज झाला आणि नागरिकांचा जमाव जमू लागताच या युवकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावातील काही युवकांनी या बुरखाधारी प्रेमविराला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. काहींनी पोलिसांना पाचारण केले. पोलिस आल्यानंतरही युवक या प्रेमविराला बदडतच होते. प्रेमविराला धुत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे प्रेयसीला भेटण्यास जाणे या युवकाला चांगलेच महागात पडले. नाशिकमध्ये मुले पळविणार्यांची टोळी फिरत असल्याची अफवा सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात पसरली जात आहे. त्यातून असे प्रकार वाढीला लागले आहे. दोनच दिवसांपूर्वी गंजमाळ परिसरातही अशाच समजुतीतून दोघांना मारहाण झाली होती.