मोह शिवारात विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या
सिन्नर: प्रतिनिधी
तालुक्यातील मोह येथील विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून 12 वर्षीय मुलगी व 9 वर्षीय मुलासह पाझर तलावात आत्महत्या केल्याची घटना काल (दि.2) सकाळी 9.15 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सौ. ज्योती विलास होलगीर (30), गौरी विलास होलगीर (12), साई विलास होलगीर (9) अशी मृतांची नावे आहे.
दरम्यान, विवाहितेचा भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन पतीसह सासरच्या चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पती, सासु-सासरा अशा तिघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मोह येथील विवाहिता सौ. ज्योती विलास होलगीर ही मुलगी गौरी व मुलगा साई यांच्यासह शनिवारी (दि.1) सकाळी 11.30 वाजता घरातून निघून गेली होती. ज्योतीचा सासरा पांडुरंग कारभारी होलगीर याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात बेपत्ता असलेबाबत तक्रार नोंदविली होती. काल (दि.2) सकाळी 9.15 वाजेच्या सुमारास मोह शिवारातील पाझर तलावात एका महिलेसह दोन चिमुकल्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर पोलिस पाटील भाऊराव काशिनाथ बिन्नर यांना माहिती दिली. बिन्नर यांनी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची खबर दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या सहाय्याने तिघांचे मृतदेह पाझर तलावातून बाहेर काढून घटनेचा पंचनामा करत शवविच्छेदनासाठी सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. प्राप्त माहितीनुसार एमआयडीसी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तथापि घटनेची माहिती ज्योती होलगीर हिच्या माहेरी समजल्यानंतर माहेरच्या नातेवाईकांनी मोह येथे धाव घेतली.
ज्योतीचा भाऊ सुनिल चिंधु सदगीर (26) रा. हिसवळ बु।।, ता. नांदगाव, जि. नाशिक याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सासरच्या लोकांकडून ज्योतीला माहेरुन एक लाख रुपये घेऊन येण्यासाठी शारिरीक व मानसिक त्रास दिला जात होता. सुरुवातीला ज्योतीने त्याकडे दुर्लक्ष केले मात्र मुलांच्या जन्मानंतरही सासरच्या लोकांकडून जाच सुरु होता. अखेर सासरच्यांकडून होणार्या जाचाला कंटाळून ज्योतीने मुलांसह आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सुनील सदगीर यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसांनी पती विलास पांडुरंग होलगीर, सासरा पांडुरंग कारभारी होलगीर, सासु फशाबाई पांडुरंग होलगीर, दिर अमोल पांडुरंग होलगीर, जाऊ सुनिता अमोल होलगीर यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम 306, 498(अ) व 34 नुसार गुन्हा दाखल केला असून पती विलास पांडुरंग होलगीर, सासरा पांडुरंग कारभारी होलगीर, सासु फशाबाई पांडुरंग होलगीर यांना अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गरुड करत आहेत.